डोंबिवलीत ९५ दुचाकीस्वारांवर कारवाई

डोंबिवली शहरात दिवसा तसेच रात्रीच्या वेळेत भरधाव दुचाकी चालवून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकी स्वारांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी गेल्या दोन महिन्यांपासून मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी पूर्व भागातील सावरकर रस्त्यावर धुमाकूळ घालणाऱ्या ३१ दुचाकीस्वारांवर कारवाई करून त्यांच्याकडून १३ हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या दुचाकींना बसविण्यात आलेले तब्बल ९५ कर्णकर्कश भोंगे जप्त करण्यात आले असून त्याची किंमत जवळपास ६३ हजारांच्या घरात आहे, अशी माहिती डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत नगराळे यांनी दिली.

डोंबिवली शहरात भरधाव दुचाकी चालविण्याचे प्रकार वाढू लागले असून यामुळे रहिवासी तसेच पादचाऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे. या पाश्र्वभूमीवर वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत नगराळे यांना अशा दुचाकीस्वारांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार फडके रस्ता, सावरकर रस्ता, घरडा सर्कल भागात वाहतूक शाखेची पथके सकाळ, संध्याकाळ आणि रात्री अशा तिन्ही वर्दळीच्या वेळेत गस्त घालीत होते. तसेच या पथकांकडून भरधाव तसेच कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई केली. त्यासाठी जयवंत नगराळे यांच्या पथकांकडून ठिकठिकाणी सापळे लावण्यात आले होते. या पथकात पोलीस उपनिरीक्षक पी. जे. ठाकूर, टोईंग व्हॅन कर्मचारी नरेश परदेशी आणि वाहतूक सेवक आदी होते. एखादा कणकर्कश भोंगावाला दुचाकीस्वार आला तर त्याला अडवून पथक त्याच्यावर कारवाई करीत होते. तसेच परदेशी हे त्या दुचाकीचा भोंगा काढण्याचे काम करीत होते. त्यासाठी त्यांनी स्वत:कडे सर्व प्रकारचे पाने ठेवले होते. गेल्या दोन महिन्यांपासून ही कारवाई सुरू आहे. एकेका दुचाकीला तीन ते चार भोंगे बसविण्यात येतात. काही दुचाकींना पोलीस गाडीला असलेले भोंगे बसविण्यात आले होते. असे दोन भोंगे जप्त करण्यात आले आहेत, असे नगराळे यांनी सांगितले.

उल्हासनगरला दुकाने

कर्णकर्कश आवाज करणारे भोंगे आपण कोठून खरेदी केले आहेत, असे वाहतूक पोलिसांनी दुचाकीस्वारांना विचारले की, त्यांना उल्हासनगर येथे हे भोंगे मिळतात, असे सांगण्यात येते. एका दर्जेदार भोंग्याची किंमत ८०० रुपये आहे. त्यापेक्षा कमी दर्जाच्या भोंग्याची किंमत ४०० ते ६०० रुपये असते. असे कर्णकर्कश भोंगे विकाणाऱ्या दुकानांची माहिती काढून संबंधित यंत्रणेला कारवाईसाठी कळविण्याचा विचार आहे, असे वाहतूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या भोंग्यांची एकूण किंमत काढली तर ती सुमारे ६३ हजार रुपयांपर्यंत झाली.