ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर वाहतूक पोलिसांचे बेकायदा पार्किंग

ठाणे, कळवा तसेच मुंब्रा शहरातील रस्त्यांवरील बेकायदा पार्किंगवर ठाणे वाहतूक पोलिसांकडून एकीकडे कारवाई केली जात असताना दुसरीकडे याच पोलिसांच्या वाहनांनी ठाणे रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांची वाट अडविली आहे. मुंबईतील एल्फि न्स्टन रेल्वे स्थानकातील अपघातानंतर सर्वच स्थानकांतील प्रवाशांच्या गर्दीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. असे असताना फेरीवाल्यांप्रमाणे पोलिसांची वाहनेही वाट अडवू लागल्याने प्रवासी त्रस्त आहेत.

ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज सहा लाख प्रवासी ये-जा करतात. एवढय़ा मोठय़ा प्रवासीसंख्येच्या तुलनेत ठाणे स्थानक अपुरे पडू लागले असून या स्थानकावरील प्रवाशांचा भार कमी करण्यासाठी मनोरुग्णालयाच्या जागेत नवीन स्थानक उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. असे असताना ठाणे स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच पोलीस आपल्या दुचाकी उभ्या करून प्रवाशांची वाट अडवीत आहेत. स्थानकातून बाहेर पडल्यानंतर सॅटीस पुलाखाली वाहतूक पोलिसांची चौकी आहे. या चौकीच्या परिसरातच ही वाहने उभी केली जातात. या भागातून मोठय़ा प्रमाणात प्रवाशांची ये-जा सुरू असते. ठाणे स्थानक परिसरातील रस्ते आणि पदपथ फेरीवाल्यांनी अडविल्यामुळे प्रवाशांना या भागातून चालणे कठीण झाले होते. या संदर्भात प्रवाशांकडून सातत्याने तक्रारी येऊ लागल्यानंतर काही महिन्यांपूर्वी महापालिका प्रशासनाने या भागात फेरीवाला हटवा मोहीम राबविली होती. त्यामुळे स्थानक परिसर फेरीवालामुक्त झाल्याचे चित्र होते. काही दिवसांनंतर मात्र पुन्हा फेरीवाले बसू लागले आहेत. फेरीवाल्यांकडून रस्ते व पदपथ अडविण्यात येत असल्याने नागरिकांना चालणे कठीण झाले आहे. त्यात आता पोलिसांच्या वाहनांची भर पडली आहे. यासंदर्भात ठाणे वाहतूक पोलीस विभागाचे उपायुक्त अमित काळे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

कारवाई थांबताच जैसे थे.

ठाणे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर वाहतूक पोलिसांची चौकी असून तिथे नो पार्किंगचे फलक लावण्यात आले आहेत. तरीही पोलीस या नियमाचे उल्लंघन करत त्या ठिकाणी बेकायदा पार्किंग करत आहेत. या वाहनांमुळे प्रवाशांना चालणे शक्य होत नाही. काही वर्षांपूर्वी वाहतूक शाखेच्या तत्कालीन पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी या भागातील पोलिसांच्या वाहनांवर कारवाई केली होती. या कारवाईनंतर त्या ठिकाणी वाहने उभी राहत नव्हती. मात्र, आता पुन्हा पोलिसांची वाहने उभी राहू लागली आहेत. पोलिसांसोबतच पत्रकार, रेल्वे आणि पालिका कर्मचाऱ्यांची वाहने या ठिकाणी उभी असतात. त्यामुळे पोलिसांबरोबरच ही वाहने प्रवाशांची वाट अडविण्यास तितकीच भर घालत आहेत.

सॅटीसखाली वाहतूक पोलिसांचा नियंत्रण कक्ष आहे. मात्र, वाहतूक पोलीस तेथील बेकायदा पार्किंगवर कारवाई करत नाहीत. जर अधिकाऱ्यांकडून कायदे मोडले जात असतील, तर सर्वसामान्यांनी काय करायचे. सुदैवाने ठाणे पश्चिमेला प्रवाशांना चालण्यासाठी मोकळी जागा आहे. मात्र, एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण?

नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, ठाणे रेल्वे प्रवासी संघटना