नव्या वर्षांत ठाण्यातील महिलांच्या एका मोठय़ा गटाला गिनिज विश्वविक्रमाचे वेध लागले आहेत. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेतील महिलांच्या नावे असलेला सर्वात लांब आणि रुंद क्रोशा शालीचा विश्वविक्रम मोडीत काढण्यासाठी चेन्नई येथे लवकरच भव्य विक्रम सोहळा आयोजित करण्यात आला असून जगभरात स्थायिक असणाऱ्या भारतीय महिलांनी यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. भारतीय महिलांच्या समूहात ठाणे शहरातील महिलांचा गटही सहभागी झाला आहे. ठाण्यातील ३३ महिलांचा सहभाग यात असून येत्या रविवारी महिलांनी तयार केलेल्या ४० बाय ४० इंचाच्या शाली एकत्र करून भव्य शाल ठाणेकर महिला तयार करणार आहेत. जगभरातील भारतीय महिलांनी तयार केलेल्या शाली एकत्र करून पाच हजार चौरस मीटरची भव्य शाल चेन्नई येथे तयार करण्यात येणार आहे. भारतीय महिलांनी बनवलेली भव्य शाल या वेळी चेन्नईच्या पटांगणात पाहायला मिळेल. यात विश्वविक्रम झाल्यानंतर या शाली वेगळ्या करून अनाथ आश्रमात या शालींचे वाटप करण्यात येणार आहे.

दक्षिण आफ्रि केतील महिलांनी ३३७४ चौरस मीटर एवढी क्रोशा शाल बनवून गिनिज बुक विक्रम केला आहे. हा विक्रम मोडीत काढण्यासाठी चेन्नईमधील सुभाशी नटराजन यांनी भव्य क्रोशा शाल तयार करण्याची आपली संकल्पना सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातील भारतीय महिलांपर्यंत पोहचवली. जगातील भारतीय महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्यावर मदर इंडिया क्रोशो क्वीन असा महिलांचा समूह तयार झाला. अनेक देशांतील भारतीय महिलांनी तयार केलेल्या शाली ६ जानेवारी रोजी चेन्नई येथे एकत्र करण्यात येणार आहेत. जगभरातील शालींचे एकत्रीकरण करून ३१ जानेवारीला पाच हजार चौरस मीटरची भव्य शाल चेन्नई येथे साकारण्यात येणार आहे. ठाण्यातील महिला गेल्या चार महिन्यांपासून ही शाल तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ठाण्यातील समूहात नऊ वर्षांच्या लहान मुलासोबत ८५ वर्षांच्या वृद्ध महिला सहभागी आहेत.

क्रोशा हा विणकाम प्रकार अलीकडे फार पाहायला मिळत नाही. क्रोशाची आवड असणाऱ्या अनेक महिलांना या विश्वविक्रम उपक्रमामुळे जागतिक स्तरावर व्यासपीठ मिळाले आहे. लोप पावत असलेल्या कलेचा प्रसार या उपक्रमामुळे होणार आहे. विश्वविक्रम झाल्यानंतर गरजू महिलांना मोफत क्रोशा कला शिकवण्यात येणार आहे, असे ठाणे समूहातील नंदिता अमरे यांनी सांगितले. भारतातील मुंबई, नाशिक, हैद्राबाद, गुरगाव, नागपूर तसेच कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूर, ओमान येथील भारतीय महिला हा विक्रम करण्यास सहभाग असणार आहेत.