जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या महिलांच्या कार्याचा गौरव १२ महिला छायाचित्रकारांनी काढलेल्या समाजसेवी महिलांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवून ठाण्यात करण्यात आला.
‘फोटो सर्कल सोसायटी’ व ‘ठाणे महानगरपालिका’ यांच्या संयुक्त विद्य्माने तीन दिवसीय ‘विद्युल्लता २०१५’ छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन ठाण्यातील कलाभवन येथे ६ ते ८ मार्च दरम्यान करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जव्हारमधील ज्येष्ठ समाजसेविका प्रमिला कोकड उपस्थित होत्या. दर वर्षी विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या महिलांना भेटून त्यांचे कार्य फोटो सर्कल सोसायटीच्या महिला छायाचित्रकार चित्रित करतात. तसेच जागतिक महिला दिनाच्या दिवशी त्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवून अशा यशस्वी महिलांना, महिला छायाचित्रकाराकडून एक प्रकारची मानवंदना दिली जाते. अशा स्वरूपाचे छायाचित्र प्रदर्शन कलाभवन येथे भरविण्यात आले होते. या प्रदर्शनास रसिक प्रेक्षकांनी मोठय़ा संख्येने हजेरी लावली होती. फोटो सर्कल सोसायटीच्या प्रदर्शनाचे यंदाचे चौथे वर्ष होते. फोटो सर्कल सोसायटीच्या वेदिका भार्गवे, स्वप्नाली मठकर, संघमित्रा बेंडखळे, वेदवती पडवळ, रेखा भिवंडीकर, नंदिनी बोरकर, गार्गी गीध, स्नेहा गोरे, अस्मिता माने, अश्विनी शिर्के , मीनल पाटील, सायली घोटीकर या महिला छायाचित्रकारांनी समाजातील तळागाळात जाऊन काम करणाऱ्या महिलांची छायाचित्रे काढून ती या प्रदर्शनात मांडली होती. या छायाचित्र प्रदर्शनात सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या जळगावच्या पद्मश्री नीलिमा मिश्रा, सोलापूरच्या चंद्रिका चव्हाण, शुभांगी बुवा, दीपा भोसले, नयन जोशी, सांगोल्याच्या डॉ. संजीवनी केळकर, औरंगाबादच्या संगीता कुलकर्णी, सुजाता दाभाडे, वर्षां पाटील, संगीता पाचंगे, लातूरच्या दीपा पाटील, तुळजापूरच्या भारतबाई देवकर, जव्हारच्या प्रमिला कोकड, घणसोलीच्या लतिका सु. मो., ठाण्याच्या शोभा वैराळ, कल्याणच्या विद्याताई धारप, यमगरवाडीच्या सुजाता गणभीर, प्रणिता मिटकर, मुळशीच्या संगीता हुलावळे, हवेलीच्या स्मिता होनप यांच्या सामाजिक कार्याचा उलगडा करणारी छायाचित्रे प्रदर्शनात मांडण्यात आली होती.