राज ठाकरे यांची भाजपवर टीका; दिघा येथील बेघरांना पाठिंबा
दादरीसारख्या घटना या ठरवून घडवल्या जात आहेत. २०१९ पर्यंत देशात दंगली घडवणे, जातीय दंगेधोपे करणे, एखादे छोटे युद्ध घडवून आणणे असले उद्योग केले जातील. त्याची पायाभरणी आतापासून सुरू आहे, असा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. आपला हा तर्क भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याला पटला आहे, असा दावा त्यांनी केला. पाकिस्तानमध्ये हिंदुस्थानातील कलाकार, गायकांचे कार्यक्रम उधळून लावण्यात येत असतील, तर त्यांच्या गायकांचे कार्यक्रम आपल्याकडे कशासाठी पाहिजेत? पाकिस्तान सरकारला दोन देशांमधील संबंध नीट नसतील तर त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात हे कळले पाहिजे. पाकला दाखवण्यासाठी गुलाम अली यांचा कार्यक्रम रद्द झाला पाहिजे.
कल्याण, डोंबिवली शहरांना ज्यांनी लुटले, तेच घरफोडे लुटारू पुन्हा तुमच्यासमोर मतांचे जोगवे मागण्यासाठी येत आहेत. कसले नियोजन नाही. या शहरात राहावे, असे येथील जुन्या कुटुंबीयांना वाटत नाही. कल्याण, डोंबिवलीची धूळदाण करणाऱ्यांना एकदा तरी सुजाण नागरिकांनी काय चाललंय या शहरांमध्ये म्हणून प्रश्न विचारावेत. नवीन पर्याय आता आहेत. त्याचा येथील जनतेने विचार करावा, असे आवाहन करत त्यांनी भाजप-शिवसेनेवर टीकास्त्र सोडले.
बेघरांच्या पाठीशी..
नवी मुंबईतील दिघा येथे न्यायालयाच्या आदेशावरून अनधिकृत बांधकामे तोडण्याची कारवाई सुरू आहे. विकासक घरे विकून निघून जातो. गरजू घरे घेणारा नाहक या व्यवस्थेत फसविला, फसला जातो. ही बांधकामे उभी राहत असतानाच विकासक, या बांधकामांची पाठराखण करणाऱ्या पालिका, सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल त्यांनी केला. कॅम्पाकोलाला एक न्याय आणि झोपडपट्टय़ांसाठी वेगळा न्याय कशासाठी, असे सांगत राज यांनी अनधिकृत बांधकामांवरील कारवाईने बेघर होणाऱ्यांच्या पाठीशी मनसे असल्याचे स्पष्ट केले.

..तर अराजक
पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी कल्याण, डोंबिवली शहरांचा विचका करून ठेवला आहे. या शहरांमध्ये पुन्हा राजकीय स्वार्थाचा खेळ करून २७ गावे समाविष्ट केली जात आहेत. हे त्या गावांच्यावर, तेथील ग्रामस्थांवर अन्याय आहे. ही गावे पालिकेत आली तर किती अराजक माजेल. या गावांची नगरपालिका, अन्य काय करायचे ते करा; पण गावांना विकासाच्या दृष्टीने न्याय मिळेल हे तर पाहा. संघर्ष समितीने गावांची नगरपालिका करण्यासाठी पालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. समितीच्या पाठीशी मनसे आहे.