ग्रामस्थांच्या दबावापुढे वसई महापालिका झुकली; २९ गावांतील हरित पट्टय़ातून मार्गक्रमण नाही
वसईत रविवारी होणाऱ्या महापौर मॅरेथॉन स्पध्रेला असलेला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध मोडून काढू, असा पवित्रा घेणाऱ्या महापालिका प्रशासनाला अखेर ग्रामस्थांच्या दबावापुढे झुकावे लागले. ग्रामस्थांकडून होणाऱ्या विरोधामुळे आयोजकांनी अखेर मॅरेथॉन स्पर्धेचा मार्ग वगळला आहे. आता ही मॅरेथॉन वसईच्या पश्चिम पट्टय़ातील २९ गावांमधून जाणार नाही. हा जनतेच्या स्वाभिमानाचा विजय असल्याचीे प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केलीे आहे.
वसई-विरार महापालिकेची पाचवी राष्ट्रीय महापौर मॅरेथॉन स्पर्धा ग्रामस्थांच्या तीव्र विरोधामुळे वादात सापडली होती. शहरातील मूलभूत समस्यांचा बोजवारा उडालेला आहे. त्यातच २९ गावे वगळण्याचा संवेदनशील प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे. असे असताना ही मॅरेथॉन २९ गावांतून धावणार होतीे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली. ‘‘ही मॅरेथॉन स्पर्धा आमच्या गावातून जाऊ देणार नाही. आम्ही मॅरेथॉन स्पर्धा उधळून लावू,’’ असा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. त्यात सर्वपक्षीय ग्रामस्थ सहभागी झाले होते. सुरुवातीला पालिकेने विरोधकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले होते. परंतु या वेळी ग्रामस्थ एकजूट झाले होते. मनवेल तुस्कानो, समीर वर्तक, डॉमनिका डाबरे, श्याम पाटकर आदी नेत्यांनी गावागावांत बैठका घेऊन ही स्पर्धा हाणून पाडण्याची तयारी केली होती. त्यातच गुरुवारी कोळी युवा शक्ती या संघटनेनेही सर्व ताकदीनीशी विरोध करण्याचा निर्णय घेतला होता. शुक्रवारी सकाळी पुन्हा पोलिसांनी आयोजकांना विनंती केली. स्पर्धेला शीघ्र कृती दल, राज्य राखीव पोलीस बलाचा बंदोबस्त दिला तर ४२ किलोमीटर अंतरात कुठेही धोका पोहोचू शकतो, असे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे अखेर सत्ताधारी आणि प्रशासन नमले आणि त्यांनी मार्ग बदलला.

मॅरेथॉनचे वैशिष्टय़े
* वसई-विरार महापालिकेच्या ५ व्या राष्ट्रीय महापौर मॅरेथॉन स्पर्धेत १५ हजार धावपटूंनी भाग घेतला आहे.
* ‘स्वच्छ वसई हरित वसई’ मॅरेथॉनचे घोषवाक्य.
* ४२ किलोमीटरच्या पूर्ण मॅरेथॉनसाठी ७०० धावपटू, २१ किलोमीटर अर्धमॅरेथॉनसाठी ६ हजार धावपटूंनी सहभाग नोंदविला आहे.
* ११ किलोमीटरसाठी बाराशे धावपटूंनी सहभाग नोंदविला आहे. ७ किलोमीटर, ५ किलोमीटर आणि दीड किलोमीटरच्या विविध शालेय गटांतून ७ हजार धावपटू या स्पर्धेत भाग घेणार आहेत.
* पालघर जिल्ह्य़ातील १२०० धावपटू या स्पर्धेत सहभागी.
* राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेते तिरंदाज दिपाकी कुमारी आणि थाळीफेकपटू कृष्णा पुनिया या स्पर्धेच्या ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून उपस्थित राहणार आहेत.
* माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्यासह मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलांवत या स्पर्धेला हजेरी लावणार आहेत.
* स्पर्धा मार्गावर २१ वॉटर स्टेशन्स तयार करण्यात आली असून त्यात ३० हजार लिटर पाण्याची व्यवस्था केली आहे.
* मेडिकल बेस कॅम्प व मेडिकल स्टेशनवरील व्यवस्था आयएएसआयएस रुग्णालय आणि विरार मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर पाहतील.
* स्पर्धा मार्गावर ५० अद्ययावत रुग्णवाहिका तैनात असतील, तसेच मोटारसायकलीवरून डॉक्टर्स गस्त घालणार आहेत.
* या स्पर्धेत धावपटू आणि प्रेक्षकांना हजर राहता यावे यासाठी पहाटे तीन वाजता चर्चगेट ते विरार ही विशेष धीमी गाडी सोडण्यात येणार आहे. विरार स्थानकात ती पहाटे ४ वाजून ५५ मिनिटांनी पोहोचणार आहे.

या मॅरेथॉनद्वारे कुठलेही शक्तिप्रदर्शन करायचे नाही. खेळाडूंची सुरक्षा महत्त्वाची आहे. जुना मार्ग आमच्याकडे तयार होता. केवळ पोलीस आणि प्रशासनाच्या विनंतीमुळे आम्ही जुन्या मार्गावरून ही स्पर्धा नेणार आहोत. आम्ही नमलो, हरलो असा याचा अर्थ होत नाही. आमची ताकद आम्ही निवडणुकीत दाखवली आहे. आम्ही शांतताप्रिय आहोत. शहराचे नाव आम्हाला देशात चांगले ठेवायचे आहेत म्हणून जुना मार्ग निवडला आहे.
– प्रकाश वनमाळी, मुख्य समन्वयक, महापौर मॅरेथॉन स्पर्धा

हा जनतेच्या स्वाभिमानाचा विजय आहे. मला पोलिसानी चार तास डांबून ठेवले होते. पोलीस बळाचा वापरही ते करू शकले नाहीत. हा ग्रामस्थांच्या एकजुटीचा विजय आहे.
– समीर वर्तक, आंदोलनाचे नेते