ठाण्यातील ३५ तलावांच्या पुनरुज्जीवनाचा निर्णय

ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा या शहरांमधील तब्बल ३५ तलावांचे पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला असून या प्रकल्पासाठी तरुण वास्तुविशारदांची फौज कामाला लावण्यात येणार आहे. या तलावांमधील गाळ काढणे, कुंपण भिंती उभारणे तसेच सुशोभीकरणासारखी दैनंदिन कामे महापालिकेतील विविध विभागांमार्फत करून घेत असताना या सुशोभीकरणाला नावीन्यपूर्ण अशा कल्पनांची किनार असावी यासाठी कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्पात मुंबईतील रचना संसद अ‍ॅकॅडमी ऑफ आर्किटेक्चर या संस्थेस सल्लागार म्हणून नेमण्यात येणार असून या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमार्फत तलाव परिसरातील कामांचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील तलावांच्या दुर्दशेच्या तक्रारी नेहमीच पुढे येत असतात. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या मासुंदा तलाव परिसरातही मोठय़ा प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र मध्यंतरी दिसून आले होते. या तक्रारींचा निपटारा व्हावा आणि तलावांचा परिसर पर्यटन केंद्र म्हणून विकसित व्हावा यासाठी महापालिकेमार्फत गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. शहरातील महत्त्वाच्या भागात असलेल्या काही तलावांमध्ये नौकाविहार, मासेमारी तसेच आसपासच्या परिसरात खाद्यविक्रीस मंजुरी देत   पालिकेने या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. असे असताना संपूर्ण पालिका क्षेत्रातील ३५ तलावांचा पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरणाचा महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प यंदा पालिकेने हाती घेतला असून या कामास कलात्मकतेची जोड असावी यासाठी तरुण वास्तुविशारदांना या कामासाठी जुंपण्यात येणार आहे.

तलाव सुशोभीकरणाचे प्रकल्प सल्लागार म्हणून मुंबईतील रचना संसद अ‍ॅकॅडमी ऑफ आर्किटेक्चर या संस्थेला नेमण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी तयार केला आहे. शहरातील अधिकाधिक तलाव परिसरात लेझर शो, सोलार पॅनल, फ्लोटिंग आर्ट विकसित करीत असताना या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आखणीत सहभागी करून घेण्याचे या प्रस्तावानुसार ठरविण्यात आले आहे. तलाव परिसरातील जागेचे सर्वेक्षण करणे, सुशोभीकरणाचा संकल्पन आराखडा तयार करणे, सविस्तर अंदाजखर्च तयार करणे अशा स्वरूपाची कामे या विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात येणार आहेत.

बहुतांश तलावांचे क्षेत्र दाट रहिवासी क्षेत्रात असल्याने ही ठिकाणे मनोरंजनाची ठिकाणे म्हणून विकसित होत आहेत. वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत पर्यटन ठिकाणांची वानवा असल्याने तलाव आणि परिसरात नागरिकांची वर्दळ मोठय़ा प्रमाणावर वाढू लागली आहे. त्यामुळे या भागात अधिकाधिक सुविधा पुरविण्याचा संकल्प यंदा महापालिका प्रशासनाने सोडला आहे. येत्या आर्थिक वर्षांत तलाव परिसरातील कामांचे पाच भागांमध्ये वर्गीकरण करण्यात आले असून त्यानुसार सुविधांचा विकास केला जाणार आहे.

शहरातील तलावांना पर्यटन केंद्राचे रूप लाभावे यासाठी मोठय़ा प्रमाणावर विद्यार्थिदशेतील वास्तुविशारद काम करतील आणि ठरावीक साचा मोडून काढत प्रत्येक ठिकाण वेगवेगळ्या कल्पना विकसित होतील, अशी आशा आहे.

– संजीव जयस्वाल, ठाणे महापालिका आयुक्त