कल्याण तहसीलदारांकडून पाहणी; मालकाचा शोध सुरू
डोंबिवली पश्चिमेतील उमेशनगर भागातील टपाल कार्यालयाच्या इमारती मागील बाजूस असलेल्या प्रशस्त मैदानात डोंगराएवढे रेतीचे ढीग उभे करण्यात आले आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी रेतीचे ढीग पाहून या भागातील रहिवासी आश्चर्य व्यक्त करीत आहेत. काही रहिवाशांनी याबाबत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली असल्याचे समजते. तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना मिळालेल्या तक्रारीवरून गोपनीयरीत्या या भागात येऊन पाहणी केली असून इतक्या मोठय़ा प्रमाणावर रेती नेमकी आली कोठून याची चर्चा रंगली आहे.
वाळू उपशाबाबत शासनाने कठोर नियम केले आहेत. असे असले तरी ठाणे जिल्ह्यातील खाडी किनारी मोठय़ा प्रमाणावर बेकायदा वाळूचा उपसा सुरू असतो. ठाण्याच्या जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी या रेतीमाफियांच्या मुसक्या आवळल्या असल्या तरी त्यांची पाठ वळताच ही मंडळी पुन्हा सक्रिय होतात असा अनुभव आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये वाळूमाफियांच्या बोटी जप्त करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. या पाश्र्वभूमीवर डोंबिवलीतील देवीचापाडा, रेतीबंदर, कुंभारखाणपाडा, ठाकुर्ली खाडी किनाऱ्यापासून दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या उमेशनगरमधील प्रशस्त भूखंडावर रेतीचे ढीग लावण्याचे काम काही डम्पर चालक करीत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या
आहेत.
उमेशनगरमधील टपाल कार्यालयाच्या इमारतीमागील जागेत हा थर उभा केला जात आहे. रात्रीच्या वेळेत रेती वाहून आणून ती अन्य जागी हलविण्यासाठी पोकलेनचा वापर केला जात आहे. ही कामे रात्रीच्या वेळेत सुरू असतात असे येथील रहिवाशांनी सांगितले. हा सगळा चोरीचा मामला असल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

उमेशनगरमध्ये साठवलेली रेती कोणाची, भूखंड कोणाचा, याची माहिती देण्यास कोणीही पुढे आले नाही. रेतीचा ताबा घेण्यासाठी कोणी मालक पुढे आला नाहीतर, रेती ठेवून देणाऱ्या जमीन मालकावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. रेतीच्या साठय़ाची मोजणी सुरू असून दंडही आकारला जाईल.
– किरण सुरवसे, तहसीलदार, कल्याण</p>

उमेशनगरमधील टपाल खात्याच्या इमारतीच्या मागील बाजूला वाळूचा साठा करण्यात आला आहे. यावेळी रात्रीच्यावेळी पोकलेनचा वापर केला जातो.