अंबरनाथजवळील वॉटर पार्कमध्ये सहलीसाठी गेलेल्या तरुणांच्या बॅगांमधील मोबाइल चोरून ते ‘ओएलएक्स’वरून विकण्याची शक्कल मोबाइल चोराला भलतीच महागात पडली. या तरुणांपैकी एकाने चोरीला गेलेल्या त्याच्या मोबाइलसारखाच मोबाइल खरेदी करण्यासाठी जेव्हा हे संकेतस्थळ गाठले तेव्हा त्याला आपलाच मोबाइल दृष्टीस पडला. त्यानंतर या तरुणानेच मोबाइल चोराच्या मुसक्या आवळल्या. ‘ओएलएक्स’वरून चोरीचे मोबाइल विकण्याचा प्रताप करणारा हा मोबाइल चोर चक्क एमबीए पदवीधारक आहे.
सुबान कुहारी हा आपला मित्र कौशल पटेल आणि अन्य एकासह सहलीसाठी अंबरनाथ येथील एका वॉटर पार्कमध्ये गेला असताना त्यांच्या खोलीतून त्यांचे काही सामान चोरीला गेले. या संदर्भात सुबानने टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रारही केली. मात्र, पोलिसांकडून त्यांना सहकार्य मिळाले नाही.
त्यानंतर सुबानने आपल्या चोरीला गेलेल्या मोबाइलसारखाच मोबाइल खरेदी करण्याचे ठरवले व त्यासाठी शोधाशोधही सुरू केली. त्या वेळी ‘ओएलएक्स’ या संकेतस्थळावर त्याला त्याच्या मोबाइलसारखाच मोबाइल आढळला. सुबानने त्याच्या मोबाइलवरील ओळखीची खूण लगेच ओळखली व त्याने मोबाइल चोराला पकडण्याचे ठरवले. संकेतस्थळावर दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून सुबानने तो मोबाइल खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. त्या वेळी विक्रेता मितेश चौरासिया याने मोबाइल खरेदीसाठी तुम्हाला कुर्ला येथे यावे लागेल, असे सांगितले. त्यानुसार सुबान सहकाऱ्यांसह कुर्ला येथे गेला. कुर्ला पोलीस ठाण्यातील पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दोन पोलीस सोबतीला देण्याची मागणी केली. पोलिसांनी ती फेटाळून लावली. शेवटी सुबान, त्यांचे वडील, भाऊ विक्रेत्याने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचले. तेथे मोबाइल विक्रेता व त्याचे तीन साथीदार आले. सुबानने विक्रेता मितेशला पकडताच इतर साथीदार पळून गेले. मितेशला पकडून कुर्ला पोलिसांच्या ताब्यात दिले. मितेश हा एम.बी.ए.चा विद्यार्थी असल्याचे तपासात उघड झाले आहे. टिटवाळा पोलिसांनी मितेशचा ताबा घेतला आहे.