आयएसआय अतिरेक्याच्या नावे एअर इंडियाच्या विमानाचे अपहरण करण्याची धमकी देणाऱ्यास श्रीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने मध्य प्रदेशमधून अटक केली आहे. दूरध्वनी करणारा २० वर्षीय तरुण असून तो १२ वी अनुत्तीर्ण आहे. व्यवसायाने शेतकरी असलेल्या या तरुणाने गुन्हय़ाची कबुली दिली असून सहज गंमत म्हणून आपण हे कृत्य केल्याचे त्याने सांगितले. मात्र पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. त्याचे नावही गुप्त ठेवण्यात आले असून न्यायालयाने या तरुणाला २ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

२० नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजून २५ मिनिटांनी एअर इंडियाच्या टोल फ्री क्रमांकावर एक निनावी कॉल आला. स्वत:ला आयएसआय या अतिरेकी संघटनेचा प्रतिनिधी असल्याची बतावणी करणाऱ्या या तरुणाने २८ नोव्हेंबर रोजी आम्ही एअर इंडियाच्या विमानाचे अपहरण करणार असल्याचे सांगितले. कॉल घेतलेल्या संबंधित महिला कर्मचाऱ्याने या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. ठाण्यातील वागळे इस्टेट भागातील एमआयडीसी कार्यालयासमोरून हा दूरध्वनी आला होता. त्यामुळे श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन त्याचा तपास सुरू झाला. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक एस.जी. तुंगेनवार, हवालदार भगवान मोरे आणि विकास लोहार मध्य प्रदेशमधील संबंधित ठिकाणी पोहोचले. स्थानिक चिंचाली पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना मदत केली आणि बोगस धमकी देणाऱ्या या तरुणाला जेरबंद करण्यास पोलिसांना यश आले.