वाहतूक कोंडी, अपघात रोखण्यासाठी लोकप्रतिनिधी आग्रही
कल्याण – शीळ फाटा रस्त्यावरील वाहनांचा भार दिवसेंदिवस वाढत आहे. डोंबिवली, कल्याण शहरांतून शीळ फाटय़ाला येणारी वाहने आणि या रस्त्यावरून बाहेर जाणारी, शहरामधील अवजड, अन्य वाहनांना चौकातूनच जावे लागते. त्यामुळे हा रस्ता वाहतूक कोंडीच्या गर्तेत दिवसेंदिवस अडकत चालला आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी काटई जंक्शन (अंबरनाथ रस्ता), मानपाडा येथील वझे चौक (जी. आर. पाटील विद्यालयासमोर) आणि नंदी हॉटेलजवळील विको नाका या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव महापालिकेमार्फत राज्य सरकारकडे पाठविण्याची तयारी सुरू झाली आहे. या उड्डाणपुलासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी कमालीचे आग्रही आहेत. त्यामुळे महापालिकेमार्फत यासंबंधीचा ठराव सरकारकडे पाठवावा असा मतप्रवाह आहे.
शीळ फाटा रस्त्यावरील पलावा चौकात उड्डाणपूल उभारण्याची मागणी यापूर्वीच करण्यात आली आहे. या रस्त्यावरून दररोज लाखो वाहने ये-जा करतात. गुजरात, नाशिक तसेच कोकण, दक्षिणेत जाणाऱ्या वाहनचालकांना शीळ फाटा हा मधला मार्ग वाटतो. त्यामुळे बहुतांशी मालवाहू व अन्य वाहनचालक या रस्त्याला पसंती देतात. त्यामुळे या रस्त्यावरील वाहनांची ये-जा वाढली आहे. त्यामुळे या मार्गावर कोंडीही वाढली आहे. मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणामार्फत या भागात काही उड्डाणपूल उभारण्याचे प्रस्ताव आखण्यात आले आहेत. त्यामुळे या प्राधिकरणाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने हे उड्डाणपूल उभारणीसाठी सहकार्य करावे, असा प्रस्ताव कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांनी मांडला आहे.
प्रस्तावित ठिकाणे
डोंबिवली शहरातून शीळ फाटा रस्त्याकडे जाणारी वाहने मानपाडा रस्ता आणि नंदी हॉटेलजवळील रस्त्यावरून बाहेर पडतात. ही वाहने शीळ फाटय़ाला मिळताना, या रस्त्यावरील वाहनांची ये-जा थांबत नाही; तोपर्यंत डोंबिवलीतून बाहेर पडणारी वाहने वळसा घेऊन शीळ फाटा रस्त्याला लागू शकत नाही. यामधूनच या चौकात एखादा वाहनचालक वळण घेत असताना समोरून येणाऱ्या गाडीने धक्का दिला तर अपघात होतो. त्यामुळे या चौकात उड्डाणपूल आवश्यक आहे, अशी मागणी करण्यात आली आहे. डोंबिवलीतून मानपाडा रस्त्यावरून बाहेर पडताना जी. आर. पाटील महाविद्यालयासमोर (वझे चौक) शीळ फाटा रस्त्यावर वाहने जाताना, शीळ फाटा रस्त्यावरील वाहनांची ये-जा थांबत नाही. तोपर्यंत शहरातून बाहेर पडणाऱ्या वाहनांना शीळ फाटा रस्त्यावर वाहन नेता येत नाही.
काटई जंक्शन येथून शीळ फाटय़ाकडून येणारी तसेच कल्याणकडून येणारी वाहने वळण घेऊन अंबरनाथच्या दिशेने निघून जातात. या वळण रस्त्यावर उड्डाणपूल उभारण्याची गरज आहे. या रस्त्यावर तिन्ही उड्डाणपूल उभारण्यात आले तर शहरातील वाहतूक आणि बाहेरून होणारी वाहतूक सुरळीत होईल आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो, तो कायमचा संपुष्टात येईल. पलावा चौकात प्राधान्याने उड्डाणपूल उभारणीला बांधकाम विभागाने प्राधान्य द्यावे, अशी मागणी भोईर यांनी केली आहे.
प्रस्तावित उड्डाणपूल..
*काटई अंबरनाथ वळण रस्ता
*मानपाडा डोंबिवली वळण रस्ता
*शीळ फाटा विको नाका वळण रस्ता