कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात स्वाइन फ्ल्यूच्या आजाराचा मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव होत असून गेल्या दोन महिन्यांत तिघांचा या आजाराने मृत्यू झाला असून महिनाभरात स्वाइन फ्ल्यूचे ५४ रुग्ण आढळले आहेत. मरण पावलेले तिघेही रुग्ण कल्याण परिसरात राहणारे होते. स्वाइन फ्ल्यूचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण लक्षणीय असले तरी, शहरांत साथ नाही, असा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे.
कल्याण-डोंबिवलीत डेंग्यूचे रुग्ण वाढत असतानाच स्वाइन फ्ल्यूनेही डोके वर काढले आहे. गेल्या महिनाभरात शहरात आढळलेल्या ५४ संशयित रुग्णांपैकी ३२ जणांना स्वाइन फ्ल्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून उर्वरित रुग्णांचे तपासणी अहवाल अद्याप मिळाले नसल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले. या आजाराने आतापर्यंत कल्याणमधील तीन जणांचा मृत्यू ओढवला आहे, अशी माहिती महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता रोडे यांनी दिली. शहरातील खासगी
रुग्णालये आणि दवाखान्यांनाही स्वाइन फ्ल्यूच्या संशयित रुग्णांची माहिती कळवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे डॉ. रोडे यांनी सांगितले.