भाईंदरमध्ये तीनचाकी सायकलवर फलक; न्यायालयाच्या आदेशांवर आगळी शक्कल
कायदा कितीही कडक केला तरी त्यातूनही पळवाटा शोधणारे तयार होतच असतात. शहरे विद्रूप होऊ नयेत यासाठी अनधिकृत फलकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सर्व महापालिकांना दिले. या कारवाईवर न्यायालयाचे लक्ष असल्याने महापालिका प्रशासन कारवाईबाबत आक्रमक झाली त्यामुळे फलकबाजीचे प्रमाण काहीसे रोडावले. मात्र न्यायालयाच्या या आदेशांमधूनदेखील पळवाटा शोधण्यात आल्या आहेत. जाहिरातींचे फलक स्थायी स्वरूपात न लावता ते चक्क तीनचाकी सायकलवर लावून मीरा-भाईंदरमध्ये धडाकेबाजपणे जाहिरातबाजी सुरू आहे. विशेष म्हणजे शहारात अशा तीनचाकी फिरत असल्याचे प्रशासनाच्या गावीही नाही.
शहारांच्या सौंदर्यात बाधा आणणाऱ्या अनधिकृत फलकबाजीला न्यायालयाने चाप लावला आहे. प्रसिद्धीची हौस फुकटात भागवून घेणारे झाडे, विद्युत दिव्यांचे खांब, सिग्नलही सोडत नसल्याने आणि महापालिका प्रशासनाकडून त्यावर कारवाई होत नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे विनापरवानगी झळकणाऱ्या फलकांवर कडक कारवाई करण्याचे आणि त्याचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश देण्यात आल्यावर प्रशासनाकडून कारवाईला सुरुवात झाली आहे. त्यामुळे झाडे, विद्युत खांब यांनी मोकळा श्वास घ्यायला सुरुवात केली आहे. मात्र यानंतरही जाहिरातबाजी करणारे स्वस्थ बसलेले नाहीत.
जाहिरात करण्यासाठी फुकट जागा बंद झाल्याने व पालिकेने निश्चित केलेल्या जागांवर जाहिरात करणे आर्थिकदृष्टय़ा परवडत नसल्याने जाहिरात करण्याची कंत्राटे घेणाऱ्यांनी आगळीच शक्कल लढवली आहे. या जाहिरातदारांनी तीनचाकी सायकलवर लोखंडी सांगाडा बसवून त्यावर जाहिरातींचे फलक लावले आहेत. या सायकल शहरातील विविध रस्त्यांवर सध्या फिरत आहेत. सायकल फिरवणारे नाक्यानाक्यावर थोडा वेळ थांबतात, नंतर पुढे सरकतात. यामुळे आपोआपच जाहिरात होते. धक्कादायक बाब म्हणजे जाहिरात करण्याचे कंत्राट घेणाऱ्याने पालिकेकडून कोणतीही परवानगीच घेतली नसल्याचे उघड झाले आहे. जाहिरात लावून शहरात सायकल फिरवण्यासाठीच्या दराबाबत चौकशी करण्यात आली होती, परंतु तशी कोणतीही अधिकृत परवानगी देण्यात आलेली नाही. विनापरवानगी जाहिरातींचे फलक लावून फिरणाऱ्या सायकल शोधून त्या जप्त करण्यात येतील, अशी माहिती महापालिकेच्या जाहिरात विभागाकडून देण्यात आली.