पालिकेच्या कारवाईत वास्तव उघड झाल्यानंतरही बचावाचा प्रयत्न

येऊरच्या पायथ्याशी असलेल्या उपवन परिसरातील सत्यम लॉजवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारताच खडबडून जागे झालेल्या वर्तकनगर पोलिसांनी शुक्रवारी लॉजच्या बांधकामाचा पंचनामा केला आणि त्यामध्ये केवळ ५१ खोल्या असल्याचा दावा केला. या लॉजमध्ये २९० खोल्या असल्याची माहिती महापालिकेने गुरुवारी जाहीर केली होती. मात्र, खोल्यांचा आकडा कमी असल्याचा दावा करत पोलिसांनी स्वतचा बचाव करण्याचा प्रयत्न करून पाहिला. परंतु, मूळात अशाप्रकारे बेकायदा कुंटणखाना सुरू असताना पोलिसांना त्याची कल्पना कशी नव्हती, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

उपवन तलावाच्या परिसरात सत्यम लॉजच्या बांधकामावर कारवाई करताना महापालिकेच्या पथकाला लॉजमध्ये २९० खोल्या आढळून आल्या. मुख्य रस्त्यावरून जाताना या लॉजचे बांधकाम कुणाच्याही नजरेस पडणार नाही, अशा पद्धतीने ही उभारणी करण्यात आली होती. गुरुवारी लॉजचे काही बांधकाम तोडण्यात आले होते. उपवनसारख्या परिसरात इतका मोठा लॉज सुरू  होता आणि त्यामध्ये अनैतिक धंदेही सुरू होते असे कारवाईतून उघड होताच वर्तकनगर पोलिस अडचणीत आले आहेत. तसेच त्यांच्या कारभारावर    आता अनेक प्रश्न उभे राहीले आहेत. त्यामुळे खडबडून जाग आलेल्या वर्तकनगर पोलिसांचे पथक शुक्रवारी सकाळी सत्यम लॉजच्या बांधकाम ठिकाणी पोहचले आणि त्यांनी बांधकामाचा पंचनामा सुरू केला. त्यामध्ये त्यांनी लॉजमध्ये नेमक्या किती खोल्या होत्या याची माहिती मिळविण्यास सुरुवात केली. लॉजमध्ये २९० खोल्या असल्याचा दावा महापालिकेने गुरूवारी केला होता. मात्र, या लॉजवर यापूर्वी १२ ते १३ वेळा छापे टाकण्यात आले असून त्याठिकाणी केवळ ५० ते ६० खोल्या दिसून आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळेच बांधकामाचा पंचनामा करत त्याद्वारे खोल्यांची आकडेवारी मिळविण्यास सुरुवात केली. त्याचवेळी महापालिकेचे पथक उर्वरित बांधकाम पाडण्यासाठी तिथे पोहचले. बांधकामाचा पंचनामा सुरू असल्यामुळे पोलिसांनी महापालिकेच्या पथकाला काही काळ थांबण्यास सांगितले. परंतु गुरुवारच्या कारवाईमुळे बांधकाम धोकादायक झाले असल्याने महापालिकेच्या पथकाने पोलिसांना पंचनामा करू नका, असा सल्ला दिला. त्यावरून दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये जुंपली होती. अखेर महापालिकेने पोलिसांना पंचनामा करू दिला आणि त्यानंतर बांधकाम तोडण्याची कारवाई सुरू केली, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

‘कोणताही वाद नाही’

उपवनमधील सत्यम लॉजच्या बांधकामांचा पंचनामा शुक्रवारी सकाळी पोलिसांनी केला. यात  २९० नसून  केवळ ५१ खोल्या आढळून आल्या आहेत. त्यामध्येही ४६ खोल्या, दोन मोठे हॉल आणि तीन खोल्या होत्या, असा दावा वर्तकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक के. जी. गावित यांनी केला आहे. तसेच पंचनामा करण्यावरून महापालिका अधिकाऱ्यांसोबत कोणताही वाद झाला नसल्याचे स्पष्ट करत पालिकेच्या कारवाईसाठी तिथे आमचे पथक तैनात होते, असे त्यांनी सांगितले.