केंद्र सरकारकडून देशभरात राबवल्या जात असलेल्या स्वच्छता अभियानाचा एक भाग म्हणून ठाणे महापालिकेनेही ‘स्वच्छ ठाणे.. सुंदर ठाणे’ संकल्पना राबवण्याचा निर्धार केला आहे. या मोहिमेत नागरिकांचा अधिकाधिक सहभाग वाढवण्यासाठी यात सामील होणाऱ्या नागरिकांना मालमत्ता करात सूट देण्याचा निर्णय महापौर संजय मोरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला.  यासंबंधीचा प्रस्ताव येत्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे.
ठाणे शहरात सार्वजनिक स्वच्छता तसेच सुशोभीकरणाला वाव मिळावा यासाठी राजकीय तसेच प्रशासकीय स्तरावर सर्वकक्ष संकल्पना आखण्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू होते. सर्वसामान्य नागरिकांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यासाठीही प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू होत्या. या हालचालींना मंगळवारी मूर्त स्वरूप देण्यात आले. महापौरांच्या दालनात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये या मोहिमेच्या प्राथमिक आराखडय़ावर चर्चा करण्यात आली. ठाणे, कळवा आणि मुंब्रा शहरांतील गृहनिर्माण संस्था, गृहसंकुले आणि झोपडपट्टय़ा अशा तीन विभागांत वर्गीकरण करून स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. प्रत्येक वसाहतींमध्ये कचऱ्याचे वर्गीकरण व्हावे यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार असून असे करणाऱ्या वसाहतींमधील रहिवाशांच्या मालमत्ता करात भरीव सुट देता येईल का, यासंबंधीचा प्रस्ताव तयार केला जाईल, अशी ग्वाही आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली.

योजना काय?
* एखाद्या वसाहतींमधील रहिवाशी संस्थेने वसाहतीच्या भितींना रंगरंगोटी केल्यास तसेच भित्तीचित्रे काढून परिसर सुशोभीकरणात हातभार लावल्यास त्या वसाहतींमधील रहिवाशांना मालमत्ता करात सूट देण्याचा विचार.
* शहरातील मोठय़ा वसाहतींमधून जाणाऱ्या रस्त्यांच्या देखभालीची, तसेच अंतर्गत स्वच्छतेची जबाबदारी वसाहतीने स्वीकारावी, याकरिता प्रोत्साहनपर योजना राबवण्याचा विचार.