३१ मेची मुदत गाठण्यासाठी कामांची विभागणी
ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या शहरांतील नालेसफाईची कामे वेळेत आणि व्यवस्थित व्हावीत, यासाठी महापालिका प्रशासनाने नालेसफाईच्या कामांसाठी यंदा अधिक ठेकेदार नेमण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक प्रभाग समित्यांमध्ये यापूर्वी एक ते दोन ठेकेदार नालेसफाईच्या कामासाठी नियुक्त केले जात होते. मात्र यंदा प्रत्येक प्रभाग समित्यांमध्ये चार ते पाच ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत शहरातील नालेसफाईची कामे करण्यात येणार असून या कामांना शनिवारपासून (आज) प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. तसेच ही कामे ३१ मेपूर्वी उरकण्याचे नियोजन महापालिकेने आखले आहे, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.
ठाणे, कळवा तसेच मुंब्रा शहरांतील नाल्यांभोवती बेकायदा बांधकामे उभी आहेत. त्यामुळे नाल्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात कचऱ्याचे ढीग जमा होत असल्याची बाब यापूर्वीच महापालिकेच्या निदर्शनास आली आहे. तसेच अशा कचऱ्यामुळे पावसाळ्यात नाल्यात पाणी तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होत असल्याचे प्रकारही यापूर्वी घडले आहेत. या पाश्र्वभूमीवर शहरातील नाल्यांची वर्षांतून दोनदा साफसफाई करण्याचा निर्णय महापालिकेने काही वर्षांपूर्वी घेतला असून या निर्णयानुसार दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाईची कामे करण्यात येतात. या कामांसाठी प्रभाग समितीनिहाय एक ते दोन ठेकेदार नियुक्त केले जातात, मात्र या ठेकेदारांना नालेसफाईसाठी ठरवून दिलेली मुदत पाळणे शक्य होत नाही. त्यामुळे पावसाळा तोंडावर आला तरी शहरातील नालेसफाईची कामे सुरूच असतात. तसेच नालेसफाईची कामे अपूर्ण असल्यामुळे पावसाचे पाणी तुंबून आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्याचा धोका असतो. या पाश्र्वभूमीवर महापालिकेने आता प्रत्येक प्रभाग समितीनिहाय नालेसफाईचे नियोजन नव्याने आखले असून त्यामध्ये नालेसफाईच्या कामासाठी ठेकेदारांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. प्रत्येक प्रभाग समितीसाठी सुमारे तीन ते चार ठेकेदार नेमण्यात येणार आहेत.

..तरच बिले मिळणार
पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले साफसफाईच्या कामाचे कंत्राट ठेकेदारांना देण्यात येते. मात्र अनेक ठेकेदारांकडून नालेसफाईची कामे व्यवस्थित केली जात नाहीत. तसेच नाल्यातील गाळ काढण्यात आला नसल्याच्या तक्रारीही येतात. या पाश्र्वभूमीवर नालेसफाईचे काम सुरू करण्यापूर्वीची परिस्थिती आणि साफसफाईनंतरची परिस्थिती असे दोन्हींचे छायाचित्रण महापालिका करणार आहे. याशिवाय,कामाचेही चित्रीकरण करणार आहे. छायाचित्र तसेच चित्रीकरणाच्या आधारेच ठेकेदारांची बिले काढण्यात येणार आहेत.
नाल्यांची संख्या..
ठाणे महापालिका हद्दीत सद्य:स्थितीत ११७ किलोमीटर अंतराचे एकूण ३०६ नाले आहेत. मुंब्य्रात ३१ किलोमीटर लांबीचे ९२ नाले आहेत. कळव्यात ९ किलोमीटरचे ४७, रायलादेवीमध्ये १७ किलोमीटरचे ३७, वर्तकनगर- १९ किलोमीटर लांबीचे- २५, मानपाडा १७ किलोमीटरचे- २६, नौपाडा येथे साडेचार किलोमीटरचे- २४, वागळेमध्ये ८ किलोमीटरचे- २०, उथळसरमध्ये साडेसात किलोमीटरचे- २४ आणि कोपरीत ४ किलोमीटर लांबीचे ११ नाले आहेत.