तीन हात नाका परिसरात १३२ गाळय़ांची उभारणी
ठाणे येथील तीन हात नाका परिसरात रस्ता रुंदीकरण मोहिमेंतर्गत बेकायदा वाढीव बांधकामे हटविण्यात आल्यामुळे मोठा भुखंड मोकळा झाला असून या भूखंडावर आता सुमारे १३२ व्यावसायिक गाळ्यांचा मिनी मॉल चार महिन्यांत उभारण्याचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे. या मॉलमध्ये तीन हात नाका परिसरात राबविण्यात आलेल्या विविध प्रकल्पांमधील विस्थापितांना गाळे उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
ठाणे शहरातील वेगवेगळ्या भागातील प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यांवर होणारी वाहतूककोंडीची समस्या सोडवण्यासाठी जयस्वाल यांनी रस्ता रुंदीकरण मोहीम हाती घेतली आहे. रुंदीकरणाच्या कामासाठी रस्त्यालगतची बेकायदा बांधकामे तोडण्यात येत आहेत. ठाणे स्थानक, पोखरण रस्ता क्रमांक एक आणि दोन या महत्त्वाच्या मार्गापाठोपाठ शहरातील तीन हात नाका या महत्त्वाच्या जंक्शन परिसरातील वाढीव बेकायदा बांधकामे हटविण्याची कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतर बेकायदा बांधकामांनी वेढलेला हा परिसर मोकळा झाला आहे. त्याचबरोबर या कारवाईमुळे याच भागात १३७४ चौरस मीटरचा भूखंड महापालिकेस उपलब्ध झाला आहे. या भूखंडावर तळ अधिक दोन मजल्याचा मिनी मॉल उभारण्यात येणार आहे.
या मिनी मॉलमध्ये प्रत्येक मजल्यावर ८ बाय ४ चौरस फुटाचे ४४ गाळे असे एकूण १३२ गाळे बांधण्यात येणार असून या मिनी मॉलमध्ये स्वतंत्र शौचालय, दोन स्वतंत्र जीने आणि लँडस्केपिंग आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या मिनी मॉलचे बांधकाम चार महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. तीन हात नाका आणि परिसरात महापालिकेने राबविलेल्या विविध प्रकल्पांमधील विस्थापितांना या मॉलमध्ये गाळे देण्यात येणार आहेत. त्यामुळे विस्थापितांचे मॉलच्या माध्यमातून पुनर्वसन होणार आहे.