पक्ष्यांची कृत्रिम घरटी उभारण्याचा पालिकेचा मनोदय
ठाणे शहरात बडय़ा बिल्डरांच्या विकास प्रकल्पांसाठी शेकडो वृक्षांच्या कत्तलीला हिरवा कंदील दाखविणाऱ्या महापालिकेने उशिरा का होईना शहरातील दुर्मीळ वृक्षांच्या संवर्धनासाठी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला असून अशा वृक्षांचे नव्याने सर्वेक्षण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. हे करत असताना घोडबंदर तसेच शहरातील इतर भागांमध्ये विस्तीर्ण परिसरात पसरलेल्या वड, पिंपळ, उंबर अशा प्रजातींच्या वृक्षांवर ‘पक्षीतीर्थ’ संकल्पनेनुसार पक्ष्यांकरिता अन्न, पाणी आणि निवाऱ्यांची व्यवस्था करण्याचा संकल्पही प्रशासनाने सोडला आहे.
एकीकडे येऊरचे विस्तीर्ण जंगल आणि दुसरीकडे बंद पडलेल्या कंपन्यांच्या जागेवर पसरलेली गर्द हिरवाई यामुळे ठाणे शहरात पक्ष्यांचे वास्तव्य मोठय़ा प्रमाणात आहे. मात्र, वृक्षांचा हा हिरवागार पट्टा टिकविण्यात महापालिकेला अपयश आले आहे. घोडबंदर तसेच इतर भागांतील मोकळ्या भूखंडांवर मोठमोठे विकास प्रकल्प उभे राहिले आहेत. हे प्रकल्प उभारताना शेकडो झाडांवर कुऱ्हाड चालवण्यास पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने परवानगी दिली. यामागचे गौडबंगाल काय, असे पर्यावरणप्रेमी विचारू लागल्याने पालिकेने आता वृक्षसंवर्धनासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
यापुढे शहरातील विविध ठिकाणी अस्तित्वात असलेल्या दुर्मीळ वृक्ष प्रजातींचे संवर्धन आणि जतन करण्याचे पालिकेने ठरवले आहे. यासाठी अशा वृक्ष प्रजातींची सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली असून यासंबंधीचा एक अहवाल लवकरच जाहीर केला जाणार आहे. या प्रजाती टिकवणे आणि त्यांची वाढ करण्यासाठी सुमारे १० लाख रुपयांची योजना वृक्ष विभागाने आखली आहे.
याशिवाय वड, िपपळ, उंबर अशा प्रजातींच्या वृक्षांवर पक्ष्यांसाठी अन्न, पाणी आणि निवाऱ्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्यासाठी या वृक्षांवर कृत्रिम घरटी उभारण्याचा प्रस्ताव तयार केला जात असून या क्षेत्रात कार्यरत असलेल्या काही संस्थांशी यासाठी संपर्क साधला जात आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली.