पोखरण रस्त्यावर ‘वॉकिंग आर्ट गॅलरी’ उभारण्याचा निर्णय

शहरातील मोकळ्या भिंतीचे सौंदर्य वाढवण्यासाठी ठाणे महापालिकेने सुरू केलेल्या ‘भिंती रंगवा..ठाणे सजवा’ या उपक्रमास ठाणेकरांचा भरभरून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता पोखरण रस्ता तसेच कॅडबरी जंक्शन परिसरात महापालिकेने चल कला केंद्र (वॉकिंग आर्ट गॅलरी) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. भिंतीवर रेखाटण्यात आलेला विविधरंगी चित्रांचा मुलामा पाहण्यासाठी येणाऱ्या कलाप्रेमींसाठी सद्य:स्थितीत पदपथांना लागून तात्पुरती शेड उभारण्यात आली आहे. मात्र, या भागात कायमस्वरूपी कला दालन उभारून भिंतींवरील कलाकृती जोपासण्यासाठी सविस्तर आराखडा तयार केला जात आहे, अशी माहिती आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ‘लोकसत्ता’ ठाणेला दिली.

तंबाखू-गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी मळकटलेल्या शहरांमधील भिंतींचा चेहरा बदलण्याचा अनोखा उपक्रम रविवारपासून ठाण्यात सुरू झाला. मुंबई, ठाण्यातील दिग्गज कलावंत, विद्यार्थी, आबालवृद्धांनी पुढाकार घेत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या भिंती रंगविण्याच्या कामात स्वतला झोकून दिले. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात कॅडबरी सेवा रस्त्याच्या भिंतीला नवी झळाळी देण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. रंग आणि कुंचल्याच्या जुगलबंदीतून ठाण्याच्या इतिहास उलगडण्याचा अनोखा प्रयत्नही या माध्यमातून करण्यात आला आहे. महापालिकेने सुरू केलेल्या या मोहिमेस मिळत असलेला ठाणेकरांचा मोठा प्रतिसाद लक्षात घेऊन पोखरण मार्गावर कायमस्वरूपी चल कला दालन उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. परदेशातील काही मोठय़ा शहरांमधील प्रमुख रस्त्यांवर अशी दालने आहेत. ही संकल्पना रुंद आणि प्रशस्त अशा पोखरण रस्त्यांवर राबविता येईल, असा दावा महापालिका आयुक्त जयस्वाल यांनी केला. ‘पालिकेच्या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी कलाप्रेमी ठाणेकरांची झालेली गर्दी पाहून या ठिकाणी कायमस्वरूपी कला दालन उभारता येईल, ही कल्पना सुचली आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत,’ असे आयुक्त म्हणाले. विविध संस्था, कलाप्रेमी नागरिक, कलावंत यांच्या सहभागातून या ठिकाणी शेड, बसण्यासाठी आसने, विद्युत दिव्यांची व्यवस्था केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.