राडेबाज लोकप्रतिनिधींमुळे अब्रूचे िधडवडे निघालेल्या ठाणे महापालिकेतील सर्वसाधारण सभेत शुक्रवारी नगरसचिव मनीष जोशी यांच्या अंगावर पाणी फेकत काही नगरसेवकांनी असंस्कृतपणाचा कळस गाठला. पाणीपुरवठा सेवेसंबंधी लक्षवेधी मांडण्याच्या मुद्दय़ावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील नगरसेवकांमध्ये सुरू झालेल्या संघर्षांतून हा प्रकार घडला. विषयपत्रिकेवरील धोरणात्मक विषयांवर सखोल चर्चा होत नसल्याबद्दल दोनच दिवसांपूर्वी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्वसाधारण सभेत नाराजी व्यक्त केली होती. या पाश्र्वभूमीवर शुक्रवारी गोंधळातच महत्त्वाच्या विषयांना मंजुरी देण्यात आली.
सांस्कृतिक शहर असा लौकिक असलेल्या ठाण्याचे प्रशासकीय पालकत्व मिरवणाऱ्या महापालिकेत गोंधळ, हाणामाऱ्या, शिवीगाळ अशा घटनांनी गेल्या तीन वर्षांत कळस गाठला आहे. त्याचीच प्रचिती शुक्रवारी आली. दोन दिवसांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांनी पाणीपुरवठा सेवेसंबंधी प्रश्न मांडण्यासाठी लक्षवेधी सूचना सादर केली होती. शुक्रवारी सभा सुरू झाल्यानंतर महापौर संजय मेरे यांनी विषयपत्रिकेवरील विषय संपल्यावरच लक्षवेधीवर चर्चा घडवून आणण्याची भूमिका घेतली. ‘आधी विषय मंजूर करा, मग पाण्यावर बोला’ असा महापौरांचा आग्रह होता. तो विरोधी सदस्यांनी अमान्य केला. त्यानंतर लक्षवेधीवर पाऊण तास चर्चा झाली. मात्र, महापौरांनी ती मध्येच थांबवून विषयपत्रिका वाचण्याचे आदेश सचिव जोशी यांना दिले. यावरून सुरू असलेल्या गोंधळातच सचिवांनी विषय वाचण्यास सुरुवात केली. तेव्हा काँग्रेसचे नगरसेवक मनोज शिंदे यांनी त्यांच्यावर पाणी फेकले.
..तर न्यायालयात जाऊ
सभेकरिता तीन दिवसांपूर्वी नोटीस देणे बंधनकारक असतानाही सभेच्या एक दिवस आधी लोकप्रतिनिधींना नोटीस देण्यात आली. त्यामुळे ही सभा बेकायदा असल्याचा आरोप विक्रांत चव्हाण यांनी केला. सभेतील गोंधळात आतापर्यंत मंजूर झालेले विषय विखंडित करण्यासंबंधीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवावा, अशी मागणी आयुक्त जयस्वाल यांच्याकडे करणार असल्याचे विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांनी सांगितले.

वडय़ाचे तेल वांग्यावर?
सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सत्तासंघर्षांचे बळी सचिन मनीष जोशी ठरत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. यापूर्वी त्यांची कॉलर पकडण्याचे आणि हातातील कागदपत्रे खेचण्याचे प्रकार घडले असून आता पुन्हा त्यांच्या अंगावर पाणी फेकण्यात आल्यामुळे अधिकारीवर्गातून कमालीची नाराजी व्यक्त होत आहे. सचिव मनीष जोशी यांच्या अंगावर पाणी फेकण्याच्या प्रकाराचे सभागृहाबाहेर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी समर्थन केले आहे. महापौर संजय मोरे यांचे नोकर म्हणून सचिव जोशी काम करीत असून त्यासाठी बेकायदेशीर कामकाज करीत आहेत, असा आरोप काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना केला.