कोर्ट नाका, कळवा पूल परिसरात मॉडेल रस्ता विकसित करण्यासाठी १४ कोदींची निविदा
वर्षांनुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या ठाणे शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांचा कायापालट करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून कळवा, कोर्ट नाका, जिल्हा रुग्णालय तसेच जिल्हाधिकारी परिसरातील प्रशासकीय ठाण्यात मॉडेल रोड विकसित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ठाणे शहर आणि कळवा खाडी पुलाच्या मध्यभागी वेगवेगळी शासकीय कार्यालये असून या ठिकाणी दररोज हजारोंच्या संख्येने नागरिकांची येजा असते. अरुंद रस्ते, वाहतुकीचा सावळागोंधळ, चुकीच्या ठिकाणी उभारण्यात आलेले चौक यामुळे या संपूर्ण परिसराची पूर्ण रया गेली आहे. हे लक्षात घेऊन या परिसराचा चेहरामोहरा बदलण्याचा आराखडा महापालिकेने तयार केला असून यासाठी सुमारे १४ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे.
ठाणे महापालिकेने मंजूर विकास आराखडय़ात नमूद केल्यानुसार रस्त्यांची आखणी सुरू केली असून शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये रस्ता रुंदीकरणाची कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहेत. यासाठी मोठय़ा प्रमाणावर तोडकामही केले जात आहे. विकास आराखडय़ातील रस्त्यांची बांधणी करत असताना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरातील काही महत्त्वाच्या मात्र वर्षांनुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या रस्त्यांच्या बांधणीकडे मोर्चा वळविला आहे. रस्ते नियोजनासंबंधी आखलेल्या सविस्तर आराखडय़ात शहरात विविध ठिकाणी मॉडेल रस्त्यांची बांधणी करण्याची घोषणा जयस्वाल यांनी यापूर्वीच केली आहे. या घोषणेचा एक भाग म्हणून ठाणे शहरालगत असलेल्या प्रशासकीय कार्यालयांसभोवतालच्या परिसराचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी नव्याने नियोजन करण्यात आले आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस मुख्यालय, कळवा पोलीस ठाणे, ठाणे सत्र न्यायालय, जिल्हा सामान्य रुग्णालयात संपूर्ण जिल्ह्य़ातील नागरिकांची येजा असते. कळवा खाडीपूल तसेच रेल्वे स्थानक परिसरातून या भागात येणाऱ्या वाहनांचा आकडाही मोठा आहे. मूळ शहराच्या वाहतुकीवरही येथील वाहनांचा भार पडत असतो. जिल्ह्य़ाचे प्रशासकीय केंद्र असलेला हा संपूर्ण परिसर पुरेशा नियोजनाअभावी ओंगळवाणा दिसू लागला आहे. या भागात वाहनतळांची पुरेशी व्यवस्था नसल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या रहाणाऱ्या वाहनांमुळे मोठय़ा प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होत असते. या पट्टय़ाचे प्रशासकीय आणि भौगोलिक महत्त्व लक्षात घेऊन महापालिकेने या ठिकाणच्या महत्त्वाच्या मार्गावर मॉडेल रस्ते विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वाहनतळांची व्यवस्था, टीएमटी बसगाडय़ांसाठी स्वतंत्र्य मार्गिका, रिक्षांसाठी थांबे, आवश्यक ठिकाणी वाहतुकीसाठी एक मार्गिकेचे नियोजन केले जात आहे.

अन्यत्रही रस्त्यांचा विकास
नव्या ठाण्याचा महत्वाचा भाग असलेला वर्तकनगर परिसरातील कोरस, दोस्ती रेंन्टल संकुल ते लक्ष्मी पार्क या वर्षांनुवर्षे दुर्लक्षीत राहीलेल्या रस्त्याचा विकासही मॉडेल रोडच्या धर्तीवर केला जाणार आहे. कोरस संकुल, रुनवाल, दोस्ती अशी मोठाली गृहसंकुले या भागात असून लक्ष्मीपार्क सारख्या मोठय़ा नागरी वसाहतीमधील रहिवाशांसाठी नव्या रस्त्याचे नियोजन सोयीचे ठरणार आहे. शास्त्रीनगर ते हत्तीपूल रस्ता रुंदीकरणामुळे या भागातील वाहतूकीचे सुसूत्रीकरण होणार आहे.