५० प्रभागांत दुसऱ्या क्रमांकावर; शिवसेनेसमोर भविष्यात मोठे आव्हान

ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेला आव्हान देत स्वबळावर निवडणूक लढवणाऱ्या भाजपला अवघ्या २३ जागांपर्यंत मजल मारता आली असली तरी, मतदारांनी कमळाला यंदा चांगलीच साथ दिल्याचे दिसत आहे. ठाण्यातील मध्यवर्ती भागांमध्ये शिवसेनेला तगडे आव्हान देणारा भाजप तब्बल ५० प्रभागांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. ठाणे महापालिका हद्दीत एरवी संघटनात्मक पातळीवर तोळामासा अवस्था असलेल्या भाजपला कुणी खिजगणतीत धरत नसे. मात्र, ३०पेक्षा अधिक जागांवर भाजपच्या उमेदवारांनी मोठय़ा प्रमाणात मते मिळवून शिवसेनेला आव्हान निर्माण करण्याची ताकद दाखवून दिली आहे.

ठाणे महापालिकेची निवडणूक वर्षांनुवर्षे युतीत लढविणाऱ्या भाजपने यंदा प्रथमच शिवसेनेशी दोन हात करण्याचा निर्णय घेतला. स्थानिक पातळीवर कच्चे नेतृत्व असल्याने शिवसेनेविरोधात पुरेशा प्रमाणात वातावरणनिर्मिती करण्यात भाजपला यश आले नसले तरी वाटतो तितकाही हा सामना एकतर्फी झालेला नाही हे निकालानंतर पुढे आलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. सत्तेची स्वप्ने पाहाणाऱ्या भाजपला केवळ २३ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपचे आठ नगरसेवक होते. मात्र, या निवडणुकीत भाजप नगरसेवकांच्या संख्येत तिप्पटीने वाढ झाली आहे. असे असले तरी भाजप महापालिकेत तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला असला तरी शिवसेनेला या पक्षाने जागोजागी आव्हान दिल्याचे स्पष्ट होत आहे. ५० जागांवर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या भाजपला शिवसेनेच्या ४६ उमेदवारांपुढे पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याचप्रमाणे या निवडणुकीत ६७ जागेवर विजय संपादन करून स्पष्ट बहुमत मिळविणाऱ्या शिवसेनेला ३८ ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली असून त्यापैकी भाजपच्या २३ उमेदवारांपुढे शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे.

bjp-chart

निसटते पराभव

ठाणे, वागळे, घोडबंदर भागात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजप उमेदवारांनी पाच हजारांपासून ते दहा हजारांहून अधिक मते मिळविली आहेत.   शिवसेनेचे संजय पांडे यांच्या विरोधात उभे असलेले भाजपचे उमेदवार शेरबहादुर सिंग यांचा केवळ १३ मतांनी पराभव झाला. तर सुधीर बर्गे यांच्या पत्नी मनीषा बर्गे यांचा ८०० मतांनी पराभव झाला. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या सेंट्रल जेल, महागिरी या प्रभागात भाजपच्या रुपाली साळवी यांचा ७२ मतांनी पराभव झाला.

शहरात सेना विरुद्ध भाजपच

ठाणे, वागळे, कोपरी, उथळसर, घोडबंदर आणि वर्तकनगर भागात बहुतांश ठिकाणी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्येच प्रमुख लढती झाल्याचे समोर आले आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपने १२० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले होते. त्यापैकी २३ ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले तर तब्बल ५० ठिकाणी भाजपला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. शिवसेनेने या निवडणुकीत ११९ उमेदवार उभे केले होते. त्यापैकी ६७ उमेदवार निवडून आले तर ३८ ठिकाणी शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. शिवसेनेच्या उमेदवारांपुढे भाजपच्या ४६ उमेदवारांचा तर भाजपच्या २३ उमेदवारांपुढे शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे.