रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची कामे सुरू नाहीच

पंधरा दिवस झोडपून काढणाऱ्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतली असली तरी ठाण्यातील रस्त्यांवर पडलेले खड्डे अद्याप कायम आहेत. ‘पाऊस कमी होताच खड्डे बुजवले जातील’ अशी आश्वासने देणाऱ्या पालिका प्रशासनाचे पाऊस उघडल्यानंतरही डोळे उघडलेले नाहीत. त्यामुळे घोडबंदर मार्गावरील काही ठिकाणांचा अपवाद वगळता शहरातील अन्य भागांतील खड्डे बुजवण्याची कामे अद्याप सुरू झालेली नाहीत. अशात पावसाने पुन्हा जोर धरल्यास कामे कशी होणार, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

यंदाच्या पावसाळय़ात ठाणेकरांचा प्रवास अतिशय कटकटीचा बनला आहे. शहरातील काही भागांत भर पावसात सुरू असलेली रस्त्यांची कामे तर इतर भागांत रस्त्यांवर पडलेले खड्डे यामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोऱ्या वाजला आहे. अवजड वाहतूक होणाऱ्या घोडबंदर तसेच मुंब्रा रेतीबंदर या मार्गाप्रमाणे शहरातील नौपाडा, लोकमान्य नगर, सावरकर नगर, कळवा, मुंब्रा या भागांतील रस्त्यांचीही अत्यंत दारुण अवस्था झाली आहे. रस्त्यांची अवस्था वाईट झाल्याने या भागांतून वाहतूक संथगतीने सुरू असते. त्याचा परिणाम वाहतूक कोंडी वाढण्यात होत आहे.

जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ापासून सुरू झालेल्या पावसामुळे रस्त्यांच्या दुर्दशेत भर पडली असताना पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पावसाच्या माऱ्यामुळे खड्डे बुजवण्यात अडचणी येत असल्याचे म्हटले होते. तसेच पावसाचा जोर ओसरताच, खड्डे बुजवण्याची कामे करण्यात येतील, असेही सांगण्यात आले; परंतु गेल्या दोन दिवसांपासून ठाण्यात कडकडीत ऊन पडले असतानाही खड्डे बुजवण्याची कामे सुरू झालेली नाहीत. त्यामुळे वाहनचालक व पादचारी यांना खड्डय़ांतून हेंदकाळतच प्रवास करावा लागत आहे.

दरम्यान, पाऊस थांबताच ठाणे महापालिकेने माजीवडा तसेच घोडबंदर भागातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची कामे युद्धपातळीवर हाती घेतली आहेत, असा दावा महापालिकेचे शहर अभियंता रतन अवसरमल यांनी केला. काही ठिकाणी जेट पॅचर तसेच पेव्हर ब्लॉक टाकून तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजविले जात आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘अधिकारी, ठेकेदारांवर गुन्हे दाखल करा’

ठाणे महापालिकेचे विकेंद्रीकरण करून प्रभाग समित्या तयार करण्यात आल्या. या समित्यांकडे त्यांच्या प्रभागातील रस्ते तसेच विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची जबाबदारी त्यांची आहे, असे ठाण्यातील दक्ष नागरिक नीलेश आंबेकर यांनी सांगितले. तसेच खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात झालेल्या अपघातांमध्ये कुणाचा मृत्यू झाला तर संबंधित चालकावर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात येतो. त्या खड्डय़ास जबाबदार  अधिकारी व ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली.