अन्य साहित्य खरेदीसाठी निधी नसल्याने पंचाईत

ठाणे परिवहन उपक्रमाची बससेवा अधिक सक्षम करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी परिवहन प्रशासनाने ३५ नवीन इंजिनांची खरेदी केली. परंतु, या इंजिनांवर दोन कोटींपेक्षा अधिक रक्कम खर्च केल्यानंतर त्यासोबत लागणाऱ्या अन्य साहित्याच्या खरेदीसाठी निधी अपुरा पडू लागल्याने ही इंजिने परिवहनच्या कार्यशाळेत धूळ खात पडली आहेत. परिवहन समितीच्या बैठकीत परिवहन व्यवस्थापकांनीच ही माहिती उघड केली.

ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात तीनशेहून अधिक बसगाडय़ा असून त्यांपैकी निम्म्या बसगाडय़ा प्रत्यक्षात रस्त्यावर धावत आहेत. उर्वरित बसगाडय़ा नादुरुस्त असल्यामुळे आगारात पडून आहेत. इंजिन बिघाड, टायर तसेच अन्य काराणांमुळे या बसगाडय़ा आगारात उभ्या आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रातील लोकसंख्येच्या मानाने टीएमटीच्या ताफ्यातील बसगाडय़ांची संख्या आधीच अपुरी असताना त्यात नादुरुस्त बसगाडय़ांची आणखी भर पडली आहे. या बसगाडय़ा दुरुस्तीअभावी आगारात उभ्या असल्याने प्रवासी सेवेकरिता उपलब्ध होत नाहीत. या पाश्र्वभूमीवर आगारातील नादुरुस्त असलेल्या बसगाडय़ांच्या दुरुस्तीसाठी परिवहन समितीने विविध साहित्यांची खरेदी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. परिवहन प्रशासनाने ३५ बसगाडय़ांच्या दुरुस्तीकरिता नवीन इंजिनची खरेदी करण्याचा प्रस्ताव सादर केला होता.

त्याला समितीनेही मान्यता दिली. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी ३५ नवीन इंजिने परिवहनच्या कार्यशाळेत दाखल झाली. परंतु, दोन महिने लोटल्यानंतरही नादुरुस्त बसगाडय़ांना नवीन इंजिने बसवण्यात आली नसल्याची बाब परिवहन समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत उघड झाली. त्यावर बसमध्ये हे इंजिन बसविण्याकरिता लागणाऱ्या अन्य साहित्यांची खरेदी करण्यात आलेली नसल्याचे कार्यशाळेकडून स्पष्ट करण्यात आले.

परिवहनसाठी लागणाऱ्या साहित्यांच्या खरेदीसाठी महापालिकेकडे प्रस्ताव पाठविण्यात येतो. मात्र, तिथे दोन-दोन महिने प्रस्तावास मंजुरी मिळत नसल्याचे स्पष्टीकरण या वेळी परिवहन व्यवस्थापक सुधीर राऊत दिले.

व्यवस्थापनावर ताशेरे

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दोन महिन्यात परिवहन उपक्रमाच्या परिस्थिती सुधारणा झाली नाही तर महापालिकेकडून मिळणारे अनुदान बंद करण्याचा तसेच टीएमटीचे खासगीकरण करण्याचा इशारा दिला होता. या पाश्र्वभूमीवर आता उघड झालेला इंजिनाचा गोंधळ परिवहन व्यवस्थापनाची अकार्यक्षमता दाखवणारा आहे, अशी टीका होऊ लागली आहे. परिवहन सदस्यांनीही समितीच्या बैठकीत एकूण कारभारावर नाराजी व्यक्त केली.