एकीकडे प्रदूषणाबाबतचे नियमभंग करणाऱ्या खासगी वाहने वा आस्थापनांवर कारवाई करण्यास पालिका सरसावत असताना ठाणे महापालिकेच्याच परिवहन उपक्रमाच्या (टीएमटी) बसगाडय़ा रस्त्यावरून धावताना काळा धूर सोडून पर्यावरणाची ऐशीतैशी करत आहेत. सिनेनाटय़ अभिनेते संतोष जुवेकर यांनी टीएमटीचे हे ‘कृष्ण’कृत्य मोबाइल कॅमेऱ्यात चित्रित करून त्याची चित्रफीत समाजमाध्यमांवरून प्रसारित केली आहे.

या काळ्या धुरामुळे पर्यावरण तसेच नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. त्यामुळे अशा सदोष बसगाडय़ा रस्त्यावर आणू नयेत, असे आवाहन संतोष जुवेकर यांनी महापालिका प्रशासनाला केले आहे. संतोष जुवेकर गुरुवारी दुपारी चारच्या दरम्यान कळव्यातील घराहून बाहेर जात असताना त्यांच्या गाडीपुढे टीएमटीची बस जात होती. या बसमधून निघणारा काळाकुट्ट धूर पाहून संतोष जुवेकर यांनी आपल्या कॅमेऱ्यातून त्याचे चित्रण केले व नंतर ही चित्रफीत समाजमाध्यमांवरून प्रसारित केली. त्यांच्या या ‘पोस्ट’वर ठाणेकरांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून अनेकांनी टीएमटीवर ताशेरे ओढले आहेत.