दुरुस्तीनंतर २० जादा बस रस्त्यावर

ठाणेकर प्रवाशांना वाहतुकीसाठी जास्तीत जास्त बसगाडय़ा उपलब्ध व्हाव्यात यासाठी ठाणे परिवहन प्रशासनाने गेल्या पंधरा दिवसांपासून किरकोळ दुरुस्तीसाठी आगारात उभ्या असलेल्या बसगाडय़ांच्या दुरुस्तीवर भर देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे किरकोळ दुरुस्तीच्या कारणास्तव आगारात धूळ खात पडलेल्या २० बसगाडय़ा प्रवाशांच्या सेवेसाठी रस्त्यावर धावू लागल्या असून या बसगाडय़ांमुळे परिवहन सेवेच्या दरदिवसाच्या उत्पन्नामध्ये तीन ते चार लाखांनी वाढ झाली आहे. या उत्पन्नवाढीमुळे परिवहनच्या दरदिवसाच्या उत्पन्नाचा आकडा २८ लाख रुपयांच्या पुढे गेला आहे.

ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात ३२५हून अधिक बसगाडय़ा असून त्यापैकी निम्म्याहून अधिक बसगाडय़ा नादुरुस्त आहेत. गेल्या दोन वर्षांपासून महापालिका प्रशासनाने टीएमटीच्या ताफ्यातील बसगाडय़ांची संख्या वाढविण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे.  १४० साध्या तर ३० वातानुकूलित बसगाडय़ा परिवहनच्या ताफ्यात दाखल झाल्या असून यामुळे गेल्या काही महिन्यांपासून २८० ते २८५ इतक्या बसगाडय़ा रस्त्यावर धावत आहेत. या बसगाडय़ांमुळे परिवहनला दरदिवसाला २४ ते २५ लाखांचे उत्पन्न मिळत होते. दररोज २८० ते २८५ बसगाडय़ा आगाराबाहेर पडत असल्या तरी शहरातील लोकसंख्येच्या मानाने या बसगाडय़ांचा आकडा कमी आहे. परिवहन प्रशासनाने गेल्या पंधरा दिवसांपासून किरकोळ दुरुस्तीसाठी आगार उभ्या असलेल्या बसगाडय़ांच्या दुरुस्तीवर भर देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे ३०५ बसगाडय़ा दररोज आगाराबाहेर पडत असून परिवहन सेवेच्या दरदिवसाच्या उत्पन्नामध्ये तीन ते चार लाखांनी वाढ झाली आहे.

या दुरुस्तीच्या कामामुळे गेल्या काही दिवसांपासून दररोज ३०५ बसगाडय़ा प्रवाशांना वाहतुकीसाठी उपलब्ध होत असून यापूर्वी २८५ बसगाडय़ा वाहतुकीसाठी उपलब्ध होत होत्या. यामुळे परिवहनच्या दररोजचे उत्पन्न २४ लाखांवरून २८ लाखांपर्यंत पोहोचले आहे

संदीप माळवी, प्रभारी परिवहनव्यवस्थापक