बसगाडय़ांमध्ये ‘ई तिकीट’ सेवा; तात्काळ मदतीसाठी विशेष यंत्रणा

गेल्या अनेक वर्षांपासूृन रडतखडत सुरू असलेली ठाणे महापालिकेची परिवहन सेवा (टीएमटी) आता ‘स्मार्ट’ अवतार धारण करू पाहात आहे. टीएमटीच्या बसगाडय़ांमध्ये डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा मोबाइलद्वारे तिकीट खरेदी करण्याची ‘ई-तिकीट’ सेवा सुरू करण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने नुकतीच या प्रस्तावाला मान्यता दिली. या सेवेसोबतच टीएमटीची एखादी बस रस्त्यातच बंद पडल्यास त्यासंबंधी परिवहनच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून तात्काळ दुरुस्ती यंत्रणेला पाचारण करण्याची सुविधाही सुरू होणार आहे.

ठाणे परिवहन सेवेच्या बसगाडय़ांसाठी निधी मंजूर करताना ई-तिकीट सेवा सुरू करण्याची अट केंद्र शासनाने घातली होती. त्यानुसार परिवहन प्रशासनाने तयार केलेल्या ई-तिकीट सेवेच्या प्रस्तावास सर्वसाधारण सभेने मान्यता दिली होती. या प्रस्तावाला मान्यता मिळून तीन वर्षांचा काळ लोटला तरी परिवहन सेवेमध्ये ई-तिकीट सेवा सुरू होऊ शकलेली नाही.

गेल्या काही महिन्यांपासून प्रशासनाने या सुविधेच्या अंमलबजावणीसाठी गांभीर्याने हालचाली सुरू केल्या आहेत. या कामाची निविदाप्रक्रिया पूर्ण झाली असून संबंधित काम ठेकेदाराला देण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. त्यामुळे आता टीएमटीच्या बसमध्ये लवकरच ई-तिकीट सेवा सुरू होईल. ई-तिकीट सेवेमुळे एटीएम कार्डद्वारे तिकिटांचे पैसे भरणे, मोबाइलद्वारे तिकीट काढणे, बस पासची तपासणी करणे, बंद पडलेल्या बसचे छायाचित्र काढून नियंत्रण कक्षाला पाठविणे अशा सुविधा प्रवाशांना मिळणार आहेत. याशिवाय, वाहकाने किती प्रवाशांना तिकिटे दिली आणि त्याच्याकडे किती पैसे जमा झाले, याचीही माहिती नियंत्रण कक्षाला मिळणार आहे, अशी माहिती प्रभारी परिवहन व्यवस्थापक संदीप माळवी यांनी दिली.

सात वर्षांसाठी काम

ई-तिकिटिंग कार्यप्रणाली ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर राबविण्यात येणार असून या कामाचा ठेका संबंधित ठेकेदाराला सात वर्षांसाठी देण्यात आला आहे. या कामासाठी दरवर्षी अंदाजे अडीच कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. या कामाच्या ठेकेदाराला दर दिवसांच्या उत्पन्नानुसार पैसे दिले जाणार आहेत. ठेकेदाराने दर दिवशी १ लाख ७५ हजार रुपये उत्पन्न मिळविले तर त्याला दर तिकिटामागे ३६ पैसे, अडीच लाखांपर्यंतच्या उत्पनाला प्रति तिकीट ३४ पैसे आणि त्यापुढील उत्पन्नासाठी प्रति तिकीट ३२ पैसे या दराने पैसे दिले जाणार आहेत. पुढील सात वर्षांपर्यंत हेच दर कायम राहणार आहेत, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.