येऊरच्या जंगलातील मोकळ्या निसर्गात मद्य प्राशन करून धिंगाणा घालणाऱ्या मंडळींना लगाम घालण्यासाठी ठाण्यातील सामाजिक आणि पर्यावरण स्नेही संस्थांनी ‘हरित गटारी’ उपक्रम हाती घेतला होता. या माध्यमातून येऊर परिसरामध्ये जाऊन तेथील नागरिकांशी संवाद साधत येणाऱ्या पर्यटकांचा मद्यपान करण्यापासून परावृत्त करण्याचा व त्यांना लगाम घालण्याच्या दृष्टीने जनजागृती करण्यात आली. या उपक्रमा अंतर्गत १४ व १६ ऑगस्ट रोजी येऊरच्या जंगलामध्ये निसर्ग अभ्यास, वृक्षारोपण, जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आला. येऊर पर्यावरण सोसायटीच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून शहरातील विविध सामाजिक संस्थांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला होता.
श्रावण महिना सुरु होण्यापुर्वीच्या दिवसात गटारीच्या नावाने मोठय़ा प्रमाणावर मांसाहार आणि मद्याचे सेवन करण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. यानिमीत्ताने गेल्या पंधरवडय़ापासून येऊर आणि उपवन परिसरात पाटर्य़ाना अक्षरश उत आला होता. येऊरच्या जंगलामध्ये जाऊन पार्टी झोडणे हा अनेक छंदी मंडळींचा आवडता उद्योग असून यामुळे जंगल परिसरात मोठय़ा प्रमाणात बाटल्यांच्या काचांचा खच निर्माण होतो. या भागात राहणारे आदीवासी आणि वन्य प्राण्यांसाठी या काचा धोकादायक ठरत आहेत. दारू सेवन करणाऱ्या या मंडळींना या समस्येची जाण होण्यासाठी पर्यावरण स्नेही संस्थांनी हरित गटारीचा उपक्रम राबवला होता.
या उपक्रमा अंतर्गत पहिल्या दिवशी परिसरातील शाळांच्या मदतीने जनजागृती करण्यात आली. या अंतर्गत परिसरात भारतीय वंशाची शंभर झाडे लावण्यात आली. पाटणापाडा येथील पंडित स्कूल च्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. श्याम घाटे व रवींद्र साठय़े या सदस्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. येऊरचे वन अधिकारी संजय वाघमोडे यावेळी उपस्थित होते.
वृक्ष तज्ज्ञ रेनी व्यास आणि कौस्तुभ भगत यांनी झाडाच्या रोपांची शास्त्रशुध्द माहिती विद्यार्थ्यांना दिली. कोर परिसरात फळझाडांची लागवड करण्यात आली.
उपक्रमाच्या दुसऱ्या दिवशी १६ ऑगस्ट रोजी पन्नासपेक्षा जास्त मंडळींनी येऊर पर्यावरण संस्थेच्या स्वयंसेवकासह निसर्ग सहलीत सहभाग घेतला होता. कीटकनाशके अभ्यासक डॉ. अमोल पटवर्धन आणि वृक्ष तज्ज्ञ डॉ. मंगला बोरकर यांनी पर्यावरणाविषयी मार्गदर्शन केले.

‘ग्रीन गटारी’ उपक्रम यशस्वी..
मागील वर्षी या भागात गटारीच्या दिवशी फिरत असताना अनेक ठिकाणी मोठय़ा गटा-गटांमध्ये बसून मद्य प्राशन केले जात होते. त्यामुळेच हा उपक्रम राबवण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. या उपक्रमात मुंबई, ठाणे परिसरातील दहा ते बार संस्था सहभागी झाल्याने मोठी जनजागृती होऊ शकली. या वर्षी मात्र या भागात दारू पिणारे दिसु शकले नाहीत. शिवाय बाटल्यांचा कचरा सुध्दा दिसत नसल्याने हा उपक्रम यशस्वी झाला असे म्हणू शकतो. या उपक्रमास मोठय़ा प्रमाणात पर्यावरण स्नेही मंडळी उपस्थित राहिल्याने येऊर परिसरात मद्यपान करणाऱ्या मंडळींच्या प्रवेशावर या निमित्ताने लगाम बसला होता. पर्यावरण स्नेही तरूणांच्या एकत्रीतपणामुळेच हे शक्य होऊ शकल्याचे संस्थेचे आदित्य सालेकर यांनी सांगितले.