संगीताची आजची अवस्था गंभीर असून, गाण्याची पातळी उथळ आणि दर्जा अत्यंत सवंग झाला आहे. शास्त्रीय संगीतात शास्त्र आहे याचाच लोकांना विसर पडला आहे. संगीत क्षेत्रात गुरूंपेक्षा आज महागुरूंचीचचलती असल्याची टीका संगीत अभ्यासक आणि संवादिनी वादक डॉ. विद्याधर ओक यांनी चैत्रपालवी संगीतोत्सवात व्यक्त केली.
चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने चैत्रपालवी संगीतोत्सवाचे आयोजन रविवारी सुयोग मंगल कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी म्हैसकर फाऊंडेशन पुरस्कृत चतुरंग संगीत सन्मान पुरस्कार ज्येष्ठ तबलावादक पं. अरविंद मुळगांवकर यांना प्रसिद्ध तबलावादक पं. भाई गायतोंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ७५ हजार रोख व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप होते. तसेच यंदाच्या चतुरंग शिष्यवृत्ती पुरस्कारासाठी शास्त्रीय गायिका भाग्यश्री पांचाळे हिला देण्यात आली. डॉ. विद्याधर ओक, शुभदा पावगी व विश्वनाथ शिरोडकर या निवड समीतीच्या वतीने हि निवड करण्यात आली. यावेळी म्हैसकर फाऊंडेशनच्या सुधा म्हैसकर, किरण जोगळेकर आदि मान्यवर उपस्थित होते.
पं. अरविंद मुळगांवकर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, गुरु उत्साद आमीर हुसैन खॉं यांना अर्पण केला. माझे गुरु आमीर हुसैन खॉं यांनी मला सौंदर्यदृष्टी दिली. चालीतील निकास कसा चांगला असावा, पढंत कशी असावी हे मला त्यांनी हात न राखता शिकविले आणि आता खॉं साहेबांचा वसा मी पुढे चालवत आहे. तबला हे नुसते साथीचे वाद्य नाही पूर्वीचा तबलजी आता तबलावादक, तबला उत्साद झाला आहे.
भाग्यश्री पांचाळ हिने संगीत क्षेत्रात करिअर करण्याचे ठरविले नव्हते, मात्र आज या क्षेत्रानेच मला नावलौकीक मिळवून दिला आहे. शास्त्रीय गायनाची आवड मला आहे, मात्र वडिलांकडून गझलचे मिळालेले बाळकडूनही आहे. शास्त्रीय संगीत व गझल या दोघांकडे एकत्र पाहण्याचा विचार करुन त्यातून नवनिर्मितीसाठी नक्कीच प्रयत्न करेल असे मत व्यक्त केले.