शेतकरी संप, भाज्यांच्या उत्पादनातील घट आणि आता उरल्यासुरल्या भाजी पिकांवर पावसाचा मारा, त्यामुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले असून त्याचा सर्वाधिक परिणाम टोमॅटोच्या पिकांवर झालेला दिसून येत आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीसारख्या शहरांमध्ये किरकोळ बाजारात टोमॅटोने शंभरी पार केल्याचे चित्र सोमवारी दिसून आले.

गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या उत्पादनामध्ये घट झाल्याने काही प्रमुख भाज्यांचे भाव वधारले असून त्यापैकी टोमॅटोच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. उत्तर तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या मुसळधार पावसामुळे टोमॅटोच्या पिकावर परिणाम होऊन आवक घटली असल्याची माहिती नवी मुंबई बाजार समिती माजी संचालक शंकर िपगळे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

घाऊक बाजारात टोमॅटो ६५-७० रुपये किलो दराने विकला जात आहे, तर किरकोळ बाजारात टोमॅटोने शंभरी पार केली आहे. गेल्या आठवडय़ापासून टोमॅटो महागले आहेत. नवी मुंबई येथील घाऊक बाजारपेठेत आवक घटल्याने ही दरवाढ झाली असल्याची माहिती ठाण्यातील किरकोळ भाजीविक्रेत्यांनी दिली आहे.

उत्तर तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्य़ांतून नवी मुंबई व कल्याण भागाला टोमॅटोचा पुरवठा होतो. त्यामध्ये प्रामुख्याने नारायणगाव, ओतुर, घोटी, पुणे, नाशिक येथील गिरनार बाजार या भागांतून मोठय़ा प्रमाणात टोमॅटोची आयात केली जाते. एरवी नवी मुंबई बाजार समितीमध्ये दर दिवशी टोमॅटोच्या शंभर गाडय़ा येतात. मात्र हे प्रमाण सध्या निम्म्यावर म्हणजे पन्नासवर येऊन ठेपले आहे. त्याचबरोबर काही महिन्यांपूर्वी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १०० ते १५० क्विंटल एवढी टोमॅटोची आवक होत होती. मात्र सोमवारी हे प्रमाण ९३ क्विंटल एवढे घटले असून परिणामी टोमॅटोचे भाव वधारले. संततधार पावसामुळे येथील पिकांचे नुकसान झाले असून टोमॅटोच्या पुरवठय़ात घट झाली असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणाऱ्या शेतकरी व्यापाऱ्यांनी सांगितले.

नेहमी कमी पुरवठय़ाचा फायदा उचलणाऱ्या किरकोळ व्यापाऱ्यांनी लागलीच १०० ते १५० रुपये दराने टोमॅटोची विक्री सुरू केली आहे. ठाण्यातील नौपाडा, गोखले रोड या भागांमधील किरकोळ विक्रेते १२०-१५० रुपये किलो दराने टोमॅटोची विक्री करत असल्याचे दिसून आले आहे.

शेतकरी संप संपुष्टात येताच मुंबई-ठाणेसारख्या शहरांना होणाऱ्या भाजीपुरवठय़ामध्ये दिवसागणिक घट होत गेली. टोमॅटोबरोबरच भेंडी, शिमला मिरची यांसारख्या भाज्यांचेही दर काही प्रमाणात वाढले आहे.

इतर कोणत्याही भाज्या महागल्या तरी त्यांना पर्याय म्हणून कडधान्ये उपलब्ध असतात. मात्र, जेवणात प्रामुख्याने वापरला जाणारा टोमॅटो महागल्यावर कोणताही पर्याय शिल्लक नाही.

प्रांजली पवार, गृहिणी