ठाणे पूर्वेतील एका व्यापाऱ्याने हनुमान जयंतीची वर्गणी दिली नाही म्हणून काँग्रेसचे पदाधिकारी रमाकांत पाटील आणि त्यांच्या साथीदारांनी त्यास जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच याप्रकरणी संबंधित व्यापाऱ्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यामुळे त्याच्या दुकानावर दगडफेकीचे प्रकार घडत आहेत. त्याच्या निषेधार्थ सोमवारी ठाणे पूर्वेतील व्यापारी संघटनांनी बाजारपेठा बंद ठेवल्या होत्या. यामुळे मार्केट परिसरात सर्वत्र शुकशुकाट पसरला होता. रमाकांत पाटील हे या भागातील नगरसेविका मालती पाटील यांचे पती आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे पूर्वेतील काँग्रेसचे पदाधिकारी रमाकांत पाटील आणि त्यांचे साथीदार बाजारपेठ परिसरात हनुमान जयंतीची वर्गणी गोळा करीत होते. या परिसरातील एका मद्यविक्रेत्याने वर्गणी देण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या रमाकांत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या विक्रेत्याच्या कानशिलात लगावली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी या मद्यविक्रेत्याकडून जबरदस्तीने पैसेही घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार घडत असताना अन्य व्यापाऱ्यांनी एकत्र  येऊन वर्गणी देण्यास नकार दिला असता, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सर्वानाच धमकावण्यास सुरुवात केली. काही व्यापाऱ्यांनी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केल्यानंतर त्यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली. व्यापाऱ्यांच्या दुकानांवर दगडफेक करण्याचे प्रकारही घडत आहेत. याविरोधात व्यापाऱ्यांनी ठाणे पूर्वेतील सोमवारी बाजारपेठा बंद ठेवल्या. याप्रकरणी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना लेखी निवेदन देण्यात आले असून याप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.