उत्तर कोकणातील वसईच्या सुपीक जमिनीतील भाज्या संपूर्ण मुंबईत प्रसिद्ध आहेत. या भागात अत्यंत चविष्ट आणि रसाळ असा पांढरा कांदा पिकतो. निर्मळ, भुईगाव आणि गास या गावात सर्वाधिक पांढरे कांदे पिकतात. वसईत आपल्याला गुलाबी, हिरवी, पांढरी आणि काळ्या रंगाची वांगी पाहायला मिळतात. ‘रवय’ आणि ‘कल्यामी’ अशा दोन जातींची वांगीदेखील आहेत. तर घुडी, वेली, बाणवांगे, भोंगाफाईट अशा आकारांमध्ये येथील वांगी दिसतात. त्याचबरोबर लसूण, गवार, टोमॅटो, चवळी, भेंडी, मिरची, मुळा, रताळे, बटाटे, कोनफळ, सुरण, हळद, कणके इत्यादी भाज्यांचे उत्पन्न वसईतील ख्रिस्ती समाज घेतो. पालेभाज्यांमध्ये पालक, मेथी, लाल-हिरवा माठ, कोथिंबीर, कढीपत्ता, पुदीना, चवळी, अळू इत्यादी तसेच ऋतुनुसार होणाऱ्या विविध पालेभाज्यांचेही उत्पन्न घेतले जाते. बांबूपासून बनवलेल्या मांडवावर कोहळा, डांगर, दुधी, कारले, शिराळे, गलके इत्यादी भाज्या पिकवल्या जातात.

समुद्रसपाटीचा प्रदेश असल्यामुळे येथे नारळ, पपई आणि सुपारीचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. येथे सुपारीला पोफळ असेही संबोधले जाते. तर या भागात कच्च्या पपईचे लोणचेही लोक बनवतात. तसेच नाताळनिमित्त लहान मुलांना आवडणारा पपई आणि साखरेपासून बनवलेला जुजूब नामक पदार्थ बनवला जातो. येथील जेवणात ओल्या नारळाचा वापर मोठय़ा प्रमाणात पाहायला मिळतो. ओगराळे, चमचे, खराटे, काथ्या, सुंभ, दोरखंड, पायपुसणी, औषधे इत्यादी गोष्टी बनवण्यासाठी नारळाच्या विविध अंगांचा वापर करतात. वसईमध्ये सिंगापुरी, बाणकोटी आणि कालिकोटी इत्यादी जातींची नारळाची झाडे आहेत. वाडीत, रस्त्याच्या कडेला, घरासमोर शेवग्याचे झाड लावण्यात येते. यासह आंबा, चिंच, फणस, पपनस, लिंबू, पेरू, महाळुंग, भोकर, चिकू, बोर, रामफळ, सीताफळ, जांभळे, सफेद जांब इत्यादी झाडांची येथे लागवड केलेली आहे. मोगरा, जुई, काकडा, जर्मन, पिवळी, जास्वंदे, तगरे इत्यादी फुलझाडांचे हंगामी उत्पन्न घेतले जाते. ही फुले मुंबईतील विविध बाजारपेठांमध्ये विकण्यासाठी नेली जातात.

वाडीत काम करणारे ते वाडवळ याअर्थी सोमवंशी समाजाला वाडवळ हे नाव पडले. वाडी म्हणजेच जेथे बागायती शेती असते. नंतर यांनी दक्षिण वसईत पानवेलीचा व्यवसाय सुरू केला. खुडलेली खायची पाने फ्रंटियर मेलने थेट पाकिस्तानला निर्यात केली जायची. जोडधंदा म्हणून येथील लोक मुंबईत दूध विकायला जात असे. त्यांच्या पेहरावावरून लोक त्यांना वसईचा दूधवाला असे ओळखू लागले. मध्यरात्री २ वाजता दूध काढून पहाटे दुधाची कावड खांद्यावर घेऊन ते लोकल ट्रेनने मुंबईला नेऊन दूध विकत असे. सुरुवातीला मातीच्या मडक्यातून दूध घेऊन जात असत. नंतर किटली, हंडे कावडीला बांधून घेऊन जाऊ  लागले.

कालांतराने, भाज्या आणि फळांची मुंबईत नेऊन विक्री करणेही सुरू झाले. वसईची भाजी आजही मुंबई उपनगरांत प्रसिद्ध आहे. त्यांना लोकल ट्रेनचा पास काढावा लागे म्हणून त्यांना ‘पासवाला’ असेही लोक संबोधत होते. दिवसभर फळे, फुले, भाजीपाला एकत्र करून त्याला व्यवस्थित रात्री बांधून घेत आणि पहाटे लोकल ट्रेनने मुंबईतील बाजारपेठांत नेऊन विकतात.

केळ्याची भरघोस उत्पन्न असल्यामुळे अनेक लोक केळ्याचा व्यवसाय करू लागले. कच्ची, पिकलेली आणि सुकेळी विविध बाजारपेठांत पाठवत होते. तसेच केळी पिकवण्यासाठी पराडय़ात (मोठय़ा आकाराचे मातीचे मडके) केळी भरत. त्याच्या तोंडाला खोलगट झाकण ठेवले जाते ज्यास नांद असे म्हणतात. त्यात तांदळाच्या तुसावर जळता कोळसा ठेवला जातो. मग हळूहळू आगीच्या उष्णतेने केळी चोवीस तासांनंतर पिकू लागतात. अशा प्रकारे व्यावसायिक पिकलेली केळी मोठय़ा प्रमाणात बाजारात पाठवत असे. (भाग २)

दिशा खातू @Dishakhatu