अतिक्रमणे, फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडीची समस्या कायम राहणार

वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून वसई-विरार शहरात शनिवारपासून सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात येणार आहे. मात्र सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतरही शहरातील वाहतूक कोंडी कमी होणार का? हा गहन प्रश्न आहे. कारण पदपथावरील अतिक्रमणे, महावितरणचे रस्त्यातच असलेले विद्युत रोहित्र, बेशिस्त रिक्षाचालक, दुकानदारांची रस्त्यावरील अतिक्रमणे, निमुळते रस्ते यांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम राहणार असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या काही वर्षांपासून वसई-विरार शहर झपाटय़ाने विकसित होत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे वाहनांची संख्या प्रचंड वाढत आहे. लोकसंख्या आणि वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या शहरात निर्माण झाली आहे. शहर वाढत असताना शहरात सिग्नल यंत्रणा नव्हती. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शहरात सिग्नल यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. वसईपासून शहरात विविध ठिकाणी टप्प्याटप्यांनी सिग्नल यंत्रणा उभारण्यात येत आहे. शनिवार, २६ नोव्हेंबर रोजी त्याचे उद्घाटन होणार आहे. मात्र सिग्नल लावले तरी वाहतूक कोंडी सुटेल का हा प्रश्न कायम राहणार आहे.

महावितरणाच्या खांबांचा अडथळा

वसई-विरार महापालिका स्थापन होण्यापूर्वी नगरपरिषद आणि ग्रामपंचायती अस्तित्वात होत्या. तेव्हापासून महावितरणाने विद्युत खांब आणि विद्युत रोहित्र उभारलेले आहेत. त्याचा मोठा अडथळा रस्त्यातील वाहनांना होत आहे. वसईच्या बऱ्हामपूर नाका, माणिकपूर, पंचाळ नगर, अंबाडी नाका, शंभर फुटी रोड आदी महत्त्वाच्या ठिकाणांवर विद्युत खांब आणि रोहित्र असून ते रस्त्यांमध्ये आले आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

फेरीवाल्यांची अतिक्रमणे

वसई स्थानक रोडपासून बाभोळा परिसरात पदपथांवर फेरिवाल्यांची अतिक्रमणे वाढलेली आहेत. दुकानदारांनी आपापल्या दुकानातील साहित्य दुकानासमोर मांडल्याने पादचाऱ्यांना चालण्यासाठी त्रास होत आहे. या फेरिवाल्यांवर महापालिका कुठलीच कारवाई करत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. अनेक गॅरेजचालक भर रस्त्यात गाडय़ा उभ्या करून दुरुस्तीचे काम करत आहेत. पदपथावर भिक्षेकरी तसेच इतर फेरीवाल्यांनी आपापले संसार थाटले आहेत.

बेशिस्त वाहनचालक

वसईत हजारो अनिधकृत रिक्षा सुरू आहेत, तसेच खाजगी मॅजिक गाडय़ा आणि बस कार्यरत आहेत. त्यांच्यावर कुणाचेच नियंत्रण नसल्याने ते कुठेही रस्त्यात गाडय़ा उभ्या करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. अनेक ठिकाणच्या रस्त्यांचे रुंदीकरण न झाल्यानेही वाहतूक कोंडीत भर पडते. विरार पश्चिमेला तर स्थानकाबाहेरील रस्ता रिक्षाने व्यापलेला असतो. त्यामुळे चालणेही कठीण होते. परिवहन सेवेच्या बसना आगर नसल्याने त्या बस रेल्वे स्थानकाच्या मुख्य रस्त्यावर असतात. वसईत एका बसने वळण घेतल्यावर किमान पाच मिनिटे  वाहतूक खोळंबते. त्यामुळे अतिक्रमणे हटवावी, अशी मागणी वसईचे स्थानिक समाजिक कार्यकर्ते नानू शेलार यांनी केली आहे.