वाहतूक कोंडीमुळे त्रस्त, अनधिकृत  रिक्षा थांब्याला विरोध

शहराच्या पूर्व भागातील केळकर रोड परिसरात असलेल्या अनधिकृत रिक्षा थांब्यामुळे या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे येथील रहिवासी व दुकानदार त्रासले असून हा रिक्षाथांबा येथून हटविण्याची मागणी गेले अनेक महिने करीत आहेत. मात्र त्यावर काहीही तोडगा निघत नसल्याने मंगळवारी केळकर रहिवासी संघाने शहर वाहतूक नियंत्रण उपविभाग कार्यालयाला धडक देऊन वाहतूक पोलिसांना याचा जाब विचारला. तसेच दुकानदारांनीही आपली दुकाने बंद ठेवून याचा निषेध नोंदविला. या संदर्भात लवकरच पोलीस उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेऊन याविषयी काय करता येईल याचा विचार केला जाईल, असे सांगत वाहतूक पोलिसांनी मात्र मोठय़ा हुशारीने आपली जबाबदारी ढकलून दिली.

डोंबिवली पूर्वेला केळकर रस्ता हा रहदारीचा रस्ता आहे. पश्चिम भागातून येणारी वाहतूक ही पूर्वेला मानपाडामार्गे याच रस्त्यावरून जाते. स्थानक परिसरातील हा रस्ता महत्त्वाचा असून येथे काही राजकीय पक्षांच्या वरदहस्ताने एक अनधिकृत रिक्षा थांबा तयार करण्यात आला आहे. वाहतुकीसाठी अरुंद असणाऱ्या या रस्त्यावर रिक्षा उभ्या राहत असून हे रिक्षाचालक अर्धाअधिक रस्ता काबीज करतात.

त्यामुळे सकाळ-संध्याकाळ या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते. या वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या ध्वनी आणि वायू प्रदूषणामुळे हैराण झालेले केळकर रोड रहिवासी आणि व्यापारी संघाने काही महिन्यांपासून आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे. या रस्त्यावरील अनधिकृत रिक्षा थांबा हटविण्यासाठी एप्रिल महिन्यात संबंधितांची बैठक घेण्यात येऊन अहवाल तयार करण्यात आला होता. मात्र त्याचे पुढे काहीही झाले नाही. गेली ५ ते ६ वर्षे आम्ही हा त्रास सहन करत आहोत. ध्वनी व वायू प्रदूषणाचा लहान मुले व आबालवृद्धांवर जास्त परिणाम होतो.वाहतूक कोंडीमुळे ज्येष्ठांना रस्ता ओलांडतानाही अनेक अडथळे पार करावे लागतात. रिक्षाचालक या रस्त्यावरून सुसाट रिक्षा चालवीत असल्याने काही नागरिक जखमीही झाले आहेत. या रस्त्यावर एकेरी वाहतूक करण्यात आली आहे, मात्र त्यात रिक्षाचालक प्रवासी उतरवित असल्याने अनेकदा वाहनांना अडथळा येतो. त्यामुळे हा थांबा हटविण्यात यावा, अशी मागणी केळकर रहिवासी संघाचे अध्यक्ष सुभाष पाटील यांनी सांगितले.

पर्यायी उपाय

केळकर रोडवरील रिक्षा थांबा हटवून तो इंदिरा चौकात हलविण्यात यावा. रिक्षातील परतीचे प्रवासी हेही इंदिरा चौकात उतरविण्यात यावेत. पाटकर रोडवरील महापालिकेच्या पादचारी पुलाखालील कामगार नाका हटवून तेथे ठाण्याच्या धर्तीवर रिक्षा थांबा बनविण्यात यावा. स्थानक परिसरातून कल्याण शीळ रोड, मानपाडा रोड, निवासी विभाग, औद्योगिक विभाग, २७ गावांचा परिसर आदी भागात जाणाऱ्या रिक्षांचे येथे अनेक थांबे आहेत. या सर्व रिक्षा या थांब्यावर थांबतील आणि तेथून सुटतील असा प्रस्ताव आम्ही वाहतूक विभागाला दिला आहे. मात्र काही राजकीय पक्षांच्याच रिक्षा संघटना असल्याने ते याला विरोध करतात. त्यामुळे आत्तापर्यंत शहरातील अनधिकृत रिक्षा थांब्याचा आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला नसल्याचे विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी सांगितले.

अहवाल कागदावरच

डोंबिवली पूर्वेला सद्यस्थितीत ३७ अधिकृत रिक्षा थांबे आहेत. या भागात आणखी ७६ नवे थांबे प्रस्तावित आहेत. या प्रस्तावात केळकर रोडवर रिक्षा थांबा दाखविण्यात आला आहे. सध्या येथे अनधिकृत रिक्षा थांबा सुरूआहे, तो बंद करण्यात यावा. या रिक्षा थांब्यामुळे केळकर रोडवर वाहतूक कोंडी होत असल्याचे येथील रहिवाशांनी वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले होते. एप्रिल महिन्यात या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पोलीस उप आयुक्त वाहतूक विभाग ठाणे यांनी एक समिती स्थापन केली होती. त्यामध्ये वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त बाबाजी आव्हाड, मोटार वाहन निरीक्षक शिंदे, शहर वाहतूक उपविभाग डोंबिवलीचे गोविंद गंभिरे व महापालिका परिवहन विभागाचे भोसले यांनी एप्रिल महिन्यात एक अहवाल तयार केला होता. त्या अहवालावर हरकती/सूचना मागविण्यात आल्या. त्यावर केवळ विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनीच हरकत नोंदवली. मात्र इतर कोणीही सूचना न दिल्याने हा अहवाल अद्यापही कागदावरच राहिला आहे.