उरणमधील जेएनपीटीमधून अवजड वाहनांचा एकाच वेळी मुख्य रस्त्यांवर प्रवेश, कल्याण दुर्गाडीजवळचा अरुंद पूल, खड्डेमय आणि दुभाजक नसलेले रस्ते आणि वाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने नारळी पौर्णिमेच्या नागरिकांच्या उत्साहावर शनिवारी पाणी पडले.
कल्याण-शीळ मार्ग तसेच भिवंडी बाह्यवळण रस्त्यावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. ही कोंडी सोडविण्याचे हरेक प्रयत्न करूनही ठाणे वाहतूक पोलिसांना वाहनांना नीट मार्गस्थ करणे जमत नव्हते. रात्री उशिरापर्यंत या भागातील वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. विशेष म्हणजे छोटय़ा वाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे कोंडीत भर पडत गेली. एमएसआरडीसीच्या ताब्यातील या रस्त्यावर काही ठिकाणी दुभाजक नसल्याने अनेक चालक आपली वाहने विरुद्ध दिशेच्या मार्गिकेतून चालवत होते. यात पालिका परिवहनच्या बसगाडय़ा रस्त्यात बंद पडल्याने परिस्थिती आटोक्याबाहेर गेली होती. वाहतूक शाखेच्या क्रेनच्या साहाय्याने या बसगाडय़ा रस्त्याच्या कडेला नेण्याचे प्रयत्न करण्यात आले; परंतु त्याला विरोध झाल्याने बस रस्त्यातच उभ्या होत्या. भिवंडी दिशेकडील रस्त्यावरही वाहतूक कोंडी वाढली. भिवंडीकडे जाणारा दुर्गाडी येथील अरुंद पूल हा वाहतूक कोंडीचे मुख्य कारण होते. कल्याणच्या शिवाजी चौकातून निघालेल्या नारळी पौर्णिमेच्या मिरवणुकीमुळे काही वेळ वाहतूक खोळंबली होती.

..अपुऱ्या सुविधा वाहतूक कोंडीस कारणीभूत
कल्याण-शीळ रस्ता एमएसआरडीसीच्या अखत्यारीत येत असून येथील सुमारे १३ ठिकाणी दुभाजक नाहीत. हॉटेल चिंतामणी, नंदीबाग, कुणाल गार्डन, हॉटेल कोकण किंग यासमोरील रस्त्यावर दुभाजक नसून ते बसवण्याचे काम रखडल्याने त्याचा फटका वाहनचालकांना बसत आहे. कोंडीवर उपाय म्हणून वाहनचालकांनी वाहतूक विभागाच्या ८२८६३००३००/ ८२८६४००४०० या हेल्पलाइन क्रमांकांवरून संपर्क साधून रस्ते निवडण्याचे आवाहन ठाणे वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी केले.