साकेत पुलाच्या कामामुळे शहरातील वाहतुकीवर ताण
येथील साकेत भागातील मुंबई-नाशिक महामार्गावरील खाडी पुलाच्या दुरुस्तीचे काम शनिवार दुपारपासून हाती घेण्यात आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक महामार्गाला जोडणाऱ्या भिवंडी, कल्याण तसेच कळवा शहरातील अंतर्गत मार्गावरून वळविण्यात आली. त्यामुळे पहिल्याच दिवशी शहरातील वाहतूक व्यवस्था पुरतीच कोलमडून पडली. कल्याण-शिळफाटा, मुंब्रा बाह्य़वळण मार्ग, कळवा-खारेगाव आणि माणकोली नाका या भागात झालेल्या वाहतूक कोंडीत अनेकजण अडकून पडले होते. अनेक ठाणेकरांनी माणकोली नाक्यापासून पायीच घरी जाण्याला प्राधान्य दिले. दरम्यान, शनिवारी सुट्टीचा दिवस असतानाही शहरातील वाहतूक व्यवस्थेवर बदलांचा इतका परिणाम जाणवल्यामुळे सोमवारपासून सकाळ-सायंकाळी शहरातील वाहतूक ठप्प होण्याची भीती व्यक्त होत आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावर साकेत परिसरात असलेल्या खाडीपुलाचे बांधकाम १९८२ मध्ये करण्यात आले होते. सांध्यातील जोडणीचा भाग उंच-सखल झाल्यामुळे पूल नादुरुस्त झाला आहे. याशिवाय, डांबरीकरणामुळे पुलावर डांबराचे थर वाढले असून त्याचाही भार पुलावर वाढला आहे. या पाश्र्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने शनिवार सकाळपासून पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला होता, मात्र प्रत्यक्षात दुपारपासून पुलाच्या कामास सुरुवात झाली आहे. या पुलाच्या दुरुस्तीसाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी मुंबई-नाशिक वाहिनीवरील वाहतूक बंद केली असून सुमारे १५ दिवस ही परिस्थिती कायम राहणार आहे.
वाहतूक अतिशय संथगतीने सुरू असल्यामुळे अनेक जण सुमारे तीन ते साडेतीन तास कोंडीत अडकून पडले होते. सुमारे ६० हजारांहून अधिक वाहने कोंडीत अडकून पडल्यामुळे वाहतूक पूर्ववत करताना वाहतूक पोलिसांची दमछाक होत होती.