खाडीपुलाच्या दुरुस्तीचा फटका; प्रवाशांचे हाल, आज वाहतूक ठप्प होण्याची भीती
ठाणे येथील साकेत भागातील मुंबई-नाशिक महामार्गावरील खाडी पुलाच्या दुरुस्तीच्या कामामुळे सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारीही कळवा, खारेगाव, रेतीबंदर, साकेत परिसरात मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. खारेगाव ते कळवा नाक्यापर्यंतचे अंतर पार करण्यासाठी पंधरा मिनिटांचा अवधी लागतो, मात्र वाहतूक कोंडीमुळे या अंतरासाठी सुमारे दीड ते दोन तासांचा अवधी लागत होता. तसेच महामार्गावरील नाशिक-मुंबई मार्गिका वाहतुकीसाठी बंद करण्यात आली असतानाही खारेगाव मार्गे महामार्गावर वाहने घेऊन येणारे चालक विरुद्घ दिशेने जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मुंबई-नाशिक मार्गिकेवरील वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडीत भर पडत आहे. या कोंडीमुळे वाहनचालकासह कळवा तसेच खारेगावमधील नागरिक अक्षरश: हैराण झाले आहेत.
मुंबई-नाशिक महामार्गावर साकेत परिसरात असलेल्या खाडीपुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे नाशिकहून मुंबईकडे जाणारी वाहिनी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आली आहे. या कामासाठी सुमारे पंधरा दिवसांचा अवधी लागणार असून तोपर्यंत ही मार्गिका वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. या वाहिनीवरील वाहतूक भिवंडी, कळवा-खारेगाव तसेच कल्याणमार्गे वळविण्यात आली आहे. महामार्गावरील मानकोली आणि रांजनोली या दोन्ही जंक्शनवरून भिवंडी शहरात येऊन कशेळी मार्गे कापुरबावडी नाका मार्गे शहरात जाण्यासाठी पर्यायी मार्ग असून या मार्गे प्रवास करण्याचे आवाहनही वाहतूक पोलिसांनी केले आहे. परंतु अनेक चालक भिवंडी शहरातून वळसा घालून ठाण्यात जाण्यास फारसे उत्सुक असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे ही वाहने महामार्गावरील जंक्शन ओलांडून पुढे आल्यानंतर त्यांना कळवा-खारेगावमार्गे शहरामध्ये सोडण्यात येतात. पुलाच्या कामामुळे नाशिक-मुंबई वाहिनी बंद असल्यामुळे नाशिक-मुंबई वाहिनीवरील वाहने चालक मुंबई-नाशिक वाहिनीवरून विरुद्घ दिशेने नेण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. वाहतूक पोलिसांकडून त्या वाहनांना रोखण्यात येते, मात्र या कारणावरून अनेक वाहनचालक त्यांच्यासोबत हुज्जत घालीत होते. तसेच या वाहनांना पुन्हा माघारी पाठविण्यासाठी मुंबई-नाशिक वाहिनीवरील वाहतूक रोखून धरावी लागत असल्यामुळे या वाहिनीवरही वाहतूक कोंडी होताना दिसून येत होती.
सहपोलीस आयुक्तांचा पहाणी दौरा..
शनिवार आणि रविवार हे दोन दिवस सुट्टीचे असतानाही पुलाच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेचा उडालेला बोजवारा लक्षात घेता सोमवारी वर्दळीच्या दिवशी शहरातील वाहतूक ठप्प होण्याची भीती व्यक्त होत आहे. या पाश्र्वभूमीवर ठाण्याचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुम्बरे यांनी रविवारी पाच तास वाहतुकीचा आढावा घेतला. कळवा, खारेगाव, मुंब्रा, साकेत, कल्याणफाटा, मानकोली, रांजनोली, कशेळी आणि कापुरबावडी येथे पाहणी केली.

कोंडीमुक्तीसाठी पर्याय मार्ग
* नाशिकहून घोडबंदरला जाणारी हलकी वाहने रांजनोली किंवा मानकोलीनाका मार्गे कशेळी पुलाद्वारे पारसिक किंवा ठाणे शहरामध्ये जाऊ शकतील.
* नाशिकहून मुंबई किंवा घोडबंदरला जाणारी जड वाहने येवई फाटा, आमने फाटा, सावदगाव, बापगाव मार्गे कल्याण गांधारी पूल-कल्याणफाटा ते कळंबोली मार्गे नवी मुंबईतून वाशी पुलामार्गे मुंबईतून इच्छित स्थळी जाऊ शकतील.
* नवी मुंबई येथून ठाणे किंवा घोडबंदरच्या दिशेने येणारी वाहने वाशी पुलाद्वारे जाऊ शकतील.

पोलिसांचे आवाहन..
साकेत खाडी पुलाचे काम अपरिहार्य असल्यामुळे ही वाहतूक वळविण्यात आली आहे. चालकांनी विरुद्ध दिशेने वाहने नेण्याचा प्रयत्न केल्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडत असल्याचे गेल्या दोन दिवसांत दिसून आले आहे. त्यामुळे वाहनचालकांनी विरुद्ध दिशेने वाहने नेण्याचा प्रयत्न करू नये. सोमवारपासून सुमारे ७० हजार वाहने रस्त्यावर येण्याची शक्यता असल्यामुळे पर्याय मार्गाचा वापर करावा, असे आवाहन ठाणे वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी केले आहे.