ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

वाहतूक कोंडीच्या वेळी खारेगाव टोलनाक्यावर टोल न आकारण्याच्या नियमाचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकार यांनी आयआरबी कंपनीला दिले. ठाणे शहर परिसरातील अभूतपूर्व वाहतूक कोंडीच्या पाश्र्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन संबंधित अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी घेतली. त्या वेळी वाहतूक कोंडी सोडवण्याच्या विविध पर्यायांचा अवलंब करण्यात निर्णय घेण्यात आला. भिवंडी मार्गावरील पाइपलाइनलगतचा सेवा रस्ता वाहतुकीसाठी वापरणे, जेएनपीटी व तलासरीच्या आसपास अवजड वाहनांसाठी पार्किंग तळ तयार करणे, त्याचप्रमाणे गोदामांच्या वेळापत्रकात बदल करणे हे उपाय योजण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठाण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी जेएनपीटीतून थेट गुजरातकडे जाणारी वाहने ठाणे-भिवंडीमार्गे जाण्याऐवजी चाकण-नाशिक-धुळे-सुरत या मार्गाने जावीत यासाठी ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी गृहखात्याला त्वरित प्रस्ताव देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी या वेळी दिले. वर्सोवा येथील पुलाच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि आयआरबीच्या अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या. या पुलाच्या दुरुस्तीचा अहवाल सोमवापर्यंत सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. जेएनपीटीमध्ये वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध असून पोलिसांच्या नियंत्रण कक्षातून सूचना मिळेपर्यंत ही वाहने न सोडण्याचे निर्देश जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले.