एमएमआरडीएकडून ९० कोटी रुपयांची निविदा

ठाणे-डोंबिवली हा प्रवास ३० ते ३५ मिनिटांवर यावा यासाठी माणकोली खाडीवर उड्डाणपुलाची पायाभरणी करणाऱ्या मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने कल्याण आणि डोंबिवली या दोन्ही शहरांतील वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून दुर्गाडी ते गांधारी पुलादरम्यान तब्बल ९० कोटी रुपये खर्च करून बाह्य़वळण रस्ता उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रस्तावास वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील अंतर्गत वाहतुकीवर पडणारा भार कमी करण्यासाठी भोपरपासून कोपर, मोठागाव, ठाकुर्ली, दुर्गाडी असा ३२ किलोमीटर अंतराचा बाह्य़वळण रस्ता उभारणीचा प्रस्ताव गेल्या काही वर्षांपासून महानगर प्राधिकरणाच्या विचाराधीन होता. कल्याण डोंबिवली महापालिकेने यासंबंधीच्या मूळ प्रस्तावास यापूर्वीच मान्यता दिली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कागदावरील या प्रस्तावास वेग देण्याचा निर्णय घेतला असून यासंबंधीच्या निविदा प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली आहे.

नियोजनाच्या आघाडीवर पूर्णपणे फसलेल्या कल्याण-डोंबिवली, टिटवाळा या शहरांना स्मार्ट करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकांच्या दरम्यान केली होती. त्यानुसार माणकोली खाडीवर पुलाचे बांधकाम सुरू करून ठाणे-डोंबिवलीदरम्यान वाहतुकीचा नवा पर्याय खुला करून देण्याचा प्रकल्पही नुकताच सुरू करण्यात आला आहे. डोंबिवलीला जोडणाऱ्या कल्याण-शीळ रस्त्यावर उन्नत मार्गाचा प्रस्तावही रस्ते विकास महामंडळामार्फत आखण्यात आला असून हा मार्ग थेट भिवंडीपर्यंत नेता येईल का याची चाचपणी सुरू करण्यात आली आहे.

या पाश्र्वभूमीवर मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने कल्याण-डोंबिवली शहरातील अंतर्गत वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणारा बाह्य़वळण रस्ता प्रकल्पाच्या अंमलबजावणीस अखेर सुरुवात करण्याचा निर्णय घेतला असून या प्रकल्पाचा एक भाग म्हणून दुर्गाडी ते गांधारी पुलादरम्यान बाह्य़वळण रस्त्याच्या कामाची निविदा मागविण्यात आली आहे. महापालिकेने एमएमआरडीएला सादर केलेल्या ३२ किलोमीटर अंतराच्या बाह्य़वळण रस्त्याच्या कामाचे प्रत्येकी आठ किमी अंतराचे टप्पे पाडण्यात आले असून यापैकी हा एक टप्पा आहे, अशी माहिती कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी ‘लोकसत्ता ठाणे’शी बोलताना दिली. या वळण रस्त्यामुळे कल्याण-डोंबिवलीलगत झपाटय़ाने उभ्या राहणाऱ्या नव्या नागरी पट्टय़ाला एक प्रकारे उभारी मिळणार असून खाडी आणि नदीकिनाऱ्यांच्या सुशोभीकरणालाही गती मिळू शकेल, असा दावा देवळेकर यांनी केला. भोपरपासून दुर्गाडीपर्यत िरगरुटचा मुळ प्रकल्प अंमलात आल्यास कल्याण शहरावर पडणारा वाहतूकीचा भार मोठय़ा प्रमाणावर कमी होऊ शकेल, असा दावाही त्यांनी केला.

फायदा काय?

  • ’ भोपरपासून दुर्गाडीपर्यंत िरगरूटचा मूळ प्रकल्प अमलात आल्यास कल्याण शहरावर पडणारा वाहतुकीचा भार मोठय़ा प्रमाणावर कमी होऊ शकेल.
  • ’ कल्याणच्या शिवाजी चौकात तसेच डोंबिवलीतील अंतर्गत भागात वाहनांचा मोठा भार पडत असून या शहरांना जोडणारा बाह्य़ रस्ता अस्तित्वात नाही. त्यामुळे अंतर्गत वाहतूक करताना दोन्ही शहरांतील मुख्य चौक वाहतूक कोंडीमुळे गजबजलेले असतात. या बाह्य़वळण रस्त्यामुळे हा भार निश्चितच कमी होऊ शकेल.

[jwplayer DfBlas1q-1o30kmL6]