चोर सोडून संन्याशाला सुळी देण्याचा सपाटा सध्या ठाणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने लावला आहे. रस्त्याकडेला उभ्या असलेल्या उदंड खासगी बसगाडय़ांकडे कानाडोळा करत टीएमटी, बेस्ट आणि वसई-विरार महापालिका परिवहन उपक्रमाच्या बसचालकांकडून दंड वसूल केला जात आहे.
ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या मीरा रोड ते कोपरी मार्गावर धावणारी; तसेच बेस्टची (एम. एच. ०१- १२७२) बोरिवली ते कोपरी मार्गावर धावणारी बस कोपरी स्कायवॉकखालील रस्त्याकडेला उभ्या केल्यावरून ठाणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने चालकांकडून दंड वसूल केला. दोन्ही बसगाडय़ा वेळेआधी कोपरी आगारात दाखल झाल्याने आगार परिसरात जागा नव्हती. त्यामुळे या बसगाडय़ा उभ्या करण्यात आल्या होत्या.
टीएमटी, बेस्ट, एनएमएमटी, वसई-विरार महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या बसेस विविध मार्गावर जाण्यासाठी ठाणे स्थानकाच्या पूर्वेकडील कोपरी परिसरातून सोडण्यात येतात. अरुंद रस्ते, अनधिकृत प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसेस आणि चारचाकी वाहनांची बेकायदा पार्किंग यामुळे कोपरी परिसरात अभूतपूर्व वाहतूक कोंडी होत असते. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना आखण्यात ठाणे पोलिसांच्या वाहतूक विभागाला फारसे यश आल्याचे चित्र नाही. सायंकाळच्या वेळेत रेल्वे स्थानकालगतच बेकायदा बसेसच्या रांगा लागलेल्या असतात. त्यांच्यावरही अपवादानेच कारवाई होत असते.
वाहतूक पोलिसांनी कारवाई केल्याने या दोन्ही प्राधिकरणाचे अधिकारी चक्रावून गेले आहेत. या दोन्ही बसेस वेळेआधी कोपरी आगार परिसरात दाखल झाल्या होत्या. कोपरी आगार परिसरात उभ्या करायला जागा नसल्याने वाहतुकीस बाधा पोहचणार नाही, अशा ठिकाणी कोपरी स्कायवॉकखाली रस्त्याच्या डाव्या बाजूला या दोन्ही बसेस उभ्या करण्यात आल्या होत्या. दीड ते दोन तास मार्गावर ‘वातानुकूलित’ गाडी चालविल्यानंतर प्रसाधनागृहात जाण्यासाठी थांबलेल्या चालकांकडून सात ते आठ मिनिटांत दंडवसुली करून वाहतूक पोलिसांनी कारवाई केली.
ठाणे स्थानक (पू) भागात बसगाडय़ा उभ्या करण्यास फारच तुटपुंजी जागा आहे. त्यामुळे कोपरी स्कॉयवॉकखाली वाहतूक नसलेल्या रिकाम्या जागेत बसगाडय़ा उभ्या केल्या जातात. सध्या या भागात ‘नो पार्किंग’ असा फलक दिसत नसला तरी स्कायवॉकच्या खांबावर नो पार्किंग असे वाहतूक पोलिसांकडून लिहिण्यात आले आहे. शासनाकडून चालविण्यात येणाऱ्या आणि प्रवाशांना सेवा देण्यासाठी असलेल्या परिवहन उपक्रमांच्या बसेसच्या चालकांकडून एकीकडे दंडवसुली सुरू असताना कोपरी आगाराला लागून सुटणाऱ्या अनधिकृत प्रवासी वाहतुकीकडे वाहतूक पोलीस कानाडोळा का करतात, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
 स्कायवॉक परिसरात बेकायदा उभ्या राहणाऱ्या कोणत्याही वाहनावर कारवाई व्हायलाच हवी हे जरी खरे असले, तरी बेकायदा बसेसवर प्रभावीपणे अशी कारवाई करताना पोलिसांकडून कुचराई का केली जाते, हा सवालही कायम आहे. अनधिकृतरीत्या खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या चारचाकी गाडय़ांचे चालक कोपरी आगार परिसरात येऊन प्रवासी घेऊन जातात. तसेच अनधिकृतरीत्या बसगाडय़ांमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसगाडय़ा वाहतूक पोलिसांकडूनच कोपरीतील गावदेवी मंदिर चौक परिसरात वळविल्या जातात.
त्या भागात अनधिकृत बसगाडय़ा दाटीवाटीने उभ्या केल्या जातात. तेव्हा परिवहन उपक्रमाच्या बसगाडय़ा कोपरी आगारात आणण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून परिवहन सेवेच्या वाहकांना वाहतूककोंडीतून मार्ग काढावा लागतो. मात्र अशा अनधिकृत बसगाडय़ांच्या चालकांवर कोणती कारवाई केली जाते, असा सवाल परिवहन उपक्रमाच्या चालकांकडून विचारला जात आहे.

चालकांच्या खिशाला भरुदड
बसगाडय़ांच्या चालकाकडून १०० रुपये दंडवसुली करताना दंड न भरल्यास वाहतुकीचा परवाना जमा करून वाहतूक शाखेत येऊन ६०० रुपये दंड भरून परवाना ताब्यात घ्यावा लागेल असे सांगितले. अन्यथा परिवहन उपक्रमाच्या या दोन्ही बसगाडय़ांना जॅमर लावण्यात येईल. म्हणून टीएमटी आणि बेस्टच्या चालकांनी स्वत:च्या खिशातून हा दंड भरला.

कारवाई सर्वावरच
कोपरी बस स्थानक परिसरात वाहतुकीस अडथळा करणाऱ्या विविध परिवहन उपक्रमाच्या तसेच खासगी बसगाडय़ांविरोधात सातत्याने कारवाई करण्यात येत असल्याचे वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी सांगितले. गेल्या तीन महिन्यांत ठाणे शहरात अशा ८६४ बसगाडय़ांविरोधात कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले.