‘रास्ता रोको’मुळे ठाणे, मुंबईला जाण्यासाठी अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याणमार्गे प्रवास

नेवाळी फाटय़ावरील  आंदोलनाचा फटका वाहतुकीला  बसला. आनंदनगर औद्योगिक वसाहतीलगतचे अंबरनाथचे प्रवेशद्वार ते काटई नाक्यापर्यंतचा कर्जत महामार्ग बंद करण्यात आला होता. त्यामुळे मुंबईला जाणाऱ्या अनेक वाहनचालकांना वळसा घालावा लागत होता.  पुणे, कर्जत, बदलापूरमार्गे नवी मुंबई, ठाणे आणि मुंबईला जाणाऱ्यांना त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागला. त्यांना अंबरनाथ पश्चिम, उल्हासनगर ते कल्याणमार्गे पुढे जावे लागले.

प्रवासी वाहनांनाही याचा मोठा फटका बसला. चिखलोली झिरो पॉइंट येथून वाहतूक फॉरेस्ट नाक्यामार्गे अंबरनाथला वळवण्यात येत होती. आनंदनगर एमआयडीसी नाक्यावरही वाहतूक बंद करण्यात आली होती. पुढे डावलपाडा येथेही हिंसक आंदोलन झाल्याने तिथेही रस्ता बंद करण्यात आला होता. कल्याण ते श्री मलंग रस्त्याची वाहतूक बंद होती.

नेवाळी फाटा पोलिसांच्या वाहनांनी भरला होता. सर्वच वाहतूक कल्याण-बदलापूर मार्गावरून होत असल्याने तेथेही वाहतूक कोंडी झाली होती.

काय आहे नेवाळी प्रकरण?

  • ब्रिटिशांनी महायुद्धाच्या वेळी आपली विमाने आणि सैनिकांची ने-आण करण्यासाठी कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील १६७६ एकर जमीन ताब्यात घेतली होती. तत्कालीन ठाणे जिल्हाधिकारी यांच्या १९४२ च्या आदेशात याचा उल्लेख असून त्या वेळी शेतकऱ्यांना मोबदला दिल्याचाही उल्लेख आहे. इंग्रजांचा अंमल संपल्यानंतर या १६७६ एकर जागेकडे दुर्लक्ष झाले. स्वातंत्र्यानंतर ही जागा संरक्षण विभागाकडे अखत्यारीत आली. नवी मुंबई विमानतळाचा प्रस्ताव रखडण्याची चिन्हे वाटत असल्याने नेवाळी हा पर्याय होतो का याची चाचपणी करण्यात आली. मात्र मलंगगडाचे डोंगर आणि भाभा अणु संशोधन केंद्राची भूमिगत प्रयोगशाळा यामुळे हा पर्याय नाकारण्यात आला.
  • शासनदरबारी दुर्लक्षित राहिलेल्या या जमिनींवर शेतकऱ्यांकडून शेती करण्यात येत आहे; परंतु गेल्या दोन महिन्यांपासून नौदलाने या ठिकाणी संरक्षक भिंत उभारण्यास सुरुवात केल्यानंतर संघर्ष उफाळून आला.
  • येथील जमिनींचा यथायोग्य वापर न केल्याने त्या जागा शेतकऱ्यांना पुन्हा देण्यात याव्यात. नौदलाची अरेरावी संपवावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांची आहे.
  • मध्यंतरी येथे वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या धर्तीवर उद्योग क्षेत्र विकसित करण्याचा प्रस्ताव होता. एमएमआरडीएने अर्थसंकल्पात तरतूदही केली होती. मात्र यावर अधिक काही होऊ शकले नाही.
  • येथील जागांवर भूमाफियांनी डोळा ठेवून येथे चाळी बांधल्या. तसेच बेकायदा बांधकामही केले. त्यामुळे नौदलाने ही जागा ताब्यात घेण्याबाबत तातडीने हालचाली सुरू केल्याचे बोलले जाते.