मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रादेशिक परिवहन विभागाचे कर्मचारी  कामाला लागले आहेत. त्यामुळे शनिवार आणि रविवार यांसह सार्वजनिक सुट्टय़ांच्या दिवशीही ठाण्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी आणि वाहनचालकांच्या गर्दीने गजबजलेले आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत सुमारे ३५० वाहनांची तपासणी केल्याची माहिती परिवहन विभागाच्या वतीने देण्यात आली.

राज्यातील नोंदणी वाहतूक पोलिसांकडून सध्या सुट्टय़ांच्या दिवसांतही काम करून घेतले जात आहे. जुन्या वाहनांची गुणवत्ता तपासण्याचे काम परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत चालत असल्याने अशा वाहनांना गुणवत्ता प्रमाणपत्र देणे हे परिवहन विभागाचे काम आहे. मात्र गाडय़ांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जुन्या गाडय़ांची संख्याही मोठय़ा प्रमाणात वाढते आहे. त्यातच पाच वर्षांपेक्षा जुन्या झालेल्या गाडय़ा वापरण्यास पात्र नसतात. त्यामुळे अशा सर्वच वाहनांची तपासणी करणे गरजेचे असते. परंतु परिवहन विभागाकडे आधीच इतर आणि नोंदणी कामांचा मोठा पसारा असल्याने अशा वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच होती. त्यामुळे एका अधिकाऱ्यास रोज २००हून अधिक गाडय़ांची तपासणी करून त्यांना योग्यता प्रमाणपत्र द्यावे लागत होते. गाडय़ांची संख्या पाहता असे प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकारी, पोलिसांच्या कामाची गुणवत्ता राखली जात नव्हती. हे उच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका जनहित याचिकेवरून न्यायालयाच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे परिवहन विभागाला गाडय़ा तपासण्याचे काम योग्य पद्धतीने करण्याचे आदेश दिले होते. तसेच वाहन तपासायला ठरावीक वेळ घेऊन योग्य पद्धतीने वाहन तपासण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. त्यानुसार परिवहन विभागाने गाडय़ांची गुणवत्ता तपासण्याच्या कामात गांभीर्य आणले असून समोरील कामांचा पसारा पाहता ठाण्याच्या शाखेत सुट्टय़ांच्या दिवसांतही काम केले जात आहे. शनिवार, रविवार अथवा इतर शासकीय सुट्टय़ांच्या दिवशी वाहन तपासणी करणारे पोलीस, अधिकारी या दिवशीही कामावर उपस्थित राहून वाहन तपासणीसाठी आलेल्या जुन्या वाहनांची तपासणी करण्याचे काम करीत आहेत.

दरम्यान, ठाणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुट्टीच्या दिवशी गुणवत्ता तपासणीसाठी आलेल्या वाहनांची गुणवत्ता तपासली जात आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट, कोलशेत आणि कशेळी या तीन भागांत वाहनांची गुणवत्ता तपासणी करण्यात येत आहे. तसेच वाहनांची तपासणी करताना त्याचे चित्रीकरणदेखील करण्यात येत आहे. त्यानुसार शनिवारी आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी पोलिसांनी सुमारे ३५० गाडय़ांची गुणवत्ता तपासून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. या वाहन तपासणीत ट्रक, छोटे टेम्पो, रिक्षा, ट्रेलर आणि प्रवासी बस गाडय़ांचा समावेश असल्याची माहीती परिवहन विभागाने दिली.

वाहनांची करण्यात येणाऱ्या फिटनेस तपासणीमुळे तांत्रिकदृष्टय़ा सक्षम वाहने रस्त्यावर येतील. त्यामुळे रस्ते अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.  – नंदकिशोर नाईक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे