वर्ग मैत्रीण असलेल्या २९ वर्षीय तरुणीशी प्रेमाच्या आणाभाका घेऊन, शारीरीक संबंध ठेऊन त्यानंतर धोका दिल्याचा प्रकार समोर आला आहे. यावर्ग मैत्रीण असलेल्या २९ वर्षीय तरुणीशी प्रेमाच्या आणाभाका घेऊन, शारीरीक संबंध ठेऊन त्यानंतर धोका दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे परिवहन विभागातील सहाय्यक मोटार निरीक्षकावर गुन्हा दाखल झाला आहे.

विजय बबन कांबळे (वय ३०) असे ठाणे परिवहन कार्यालयातील सहाय्यक मोटार निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या आरोपी अधिकाऱ्याचे नाव आहे. कांबळे याने सोलापूर येथील आपल्या वर्ग मैत्रिणीला तिचे लग्न झालेले असताना अवघ्या सात महिन्यांतच घटस्फोट घेण्यास भाग पाडले. त्यासाठी त्याने तीला गोड बोलून मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. तुझा पत्नी म्हणून स्वीकार करतो, असे वारंवार आश्वासन दिले. त्याच्या या आश्वासनांना बळी पडत पिडीत तरुणीने स्वॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या पतीला गेल्या वर्षी घटस्फोट देवून ती वर्षभरापासून विजय कांबळे याच्यासोबत नवी मुंबईतील गोठवली येथे भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहू लागली. विजय याने पिडीत तरुणीच्या समजूतीसाठी एका नोटरीवर सही घेवून आपले लग्न झाल्याचे तीला सांगितले. दरम्यान, एकत्र राहत असताना पिडीतेने ती गरोदर असल्याचे सांगताच विजय कांबळे याने तीला गर्भपात करण्याचा आग्रह धरला. यावर पीडितेने हे मुल तुझेच असल्याचे सांगत कांबळेच्या गर्भपाताच्या मागणीला नकार दिला. मात्र, त्यानंतर कांबळे याने पीडितेला शिवीगाळ व मारहाण करू लागला. त्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून त्याने तीच्याशी संबंध तोडून नवा घरोबा करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे पीडीतेने अखेर रबाळे पोलीस ठाण्यात विजय कांबळे याच्याविरोधात भादंवि. ३७६, ४२०, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

मात्र, या गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत कणसे यांनी आरोपी कांबळेची मदत करून त्याला या गंभीर गुन्ह्यातून न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासाठी मदत केल्याचा आरोप पिडीत महिलेने केला आहे. तसेच  या प्रकरणातील गुन्ह्याचा अहवाल हा ठाणे परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे शासकीय नियमानुसार गंभीर गुन्ह्याचा तपास पुर्ण होईपर्यंत विजय कांबळे याला निलंबित करणे क्रमप्राप्त असताना तसे न झाल्याने विजय कांबळेला या अधिकाऱ्याचेही पाठबळ असल्याचा आरोप पीडितेने केला आहे. आपल्याला न्याय मिळावा व दोषींवर कारवाई व्हावी यासाठी पिडीत महिलेने आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेऊन लेखी तक्रार दिली आहे.

या प्रकरणी रबाळे पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण देण्यास टाळाटाळ केली. तर ठाणे परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांना वारंवार संपर्क करूनही तो होऊ शकला नाही.