आधी कापण्यास मनाई, मग पुनरेपणाच्या अटीवर परवानगी
रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली ठाण्यातील शेकडो झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात येणार असल्याच्या वृत्तावर ठाणेकरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर तो निर्णय रद्द करणाऱ्या महापालिकेने आता सावधपणे पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. ठाणे शहरातील एकाही बांधकाम व्यावसायिकाला वृक्ष तोडण्यास परवानगी दिली जाणार नाही, अशी घोषणा पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बुधवारी केली. मात्र, त्याच वेळी ‘पुनरेपणाची तयारी दाखवल्यास विकासप्रस्तावांना वृक्षकापणीस मान्यता दिली जाईल’ असे सांगत यातून पळवाटही त्यांनीच दाखवली. ठाण्यातील आतापर्यंतच्या वृक्ष पुनरेपणाची पाश्र्वभूमी पाहता आयुक्तांची ही घोषणा बिल्डरांच्या पथ्यावरच पडण्याची शक्यता आहे.
ठाणे महापालिकेमार्फत शहरात पाच लाख वृक्षांची लागवड केली जाणार आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी जयस्वाल यांनी एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत वृक्ष संवर्धनासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष समितीची घोषणा करण्यात आली. या समितीत पालिकेच्या पदाधिकाऱ्यांसोबत वृक्ष मित्रांचाही समावेश केला जाणार आहे. तसेच वृक्षतोडीसाठी वृक्ष प्राधिकरण समितीकडे जे प्रस्ताव प्राप्त होतात ते प्रस्ताव आधी या विशेष समितीसमोर सादर करण्यात येतील. त्यानंतरच ते वृक्ष प्राधिकरण समितीसमोर येतील, असे ठरविण्यात आले.
या पुढे कुठल्याही विकासकाला विकास प्रस्तावातंर्गत बाधित होणारी झाडे तोडण्याची परवानगी दिली जाणार नाही, असा निर्णय या वेळी घेण्यात आला. हा निर्णय घेताना वृक्षांच्या पुनरेपणाची तयारी दाखविल्यास प्रकल्पांना मान्यता दिली जाईल, असेही ते म्हणाले. पोखरण रस्त्याच्या कामात वृक्षाचे पुनरेपण वादात सापडले आहे. असे असताना वृक्षाच्या पुनरेपण करणाऱ्या बिल्डरांना परवानगी दिली जाईल, असे सांगत आयुक्तांनीच बांधकाम व्यावसायिकांना पळवाट दाखवल्याची चर्चा आहे.

अधिक झाडे लावणे बंधनकारक
आतापर्यंत तोडण्यात येणाऱ्या एका झाडाच्या मोबदल्यात पाच झाडे लावण्याचा नियम होता. त्याऐवजी आता १५ झाडे लावण्याचे बंधनकारक करण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. या १५ झाडांपैकी ५ झाडे पुनरेपण करण्यात येतील. विकासकास सदरची झाडे कुठे लावण्यात येणार आहेत याचा आराखडाही यापुढे महापालिकेस सादर करावा लागणार आहे. दरम्यान पुनरेपीत करण्यात येणारी झाडे ही पाच वर्षांपेक्षा अधिक वयाची असावीत, असेही जयस्वाल यांनी या बैठकीत स्पष्ट केले.

नागरिकांना आवाहन
यावर्षी जास्तीत जास्त वृक्ष लागवड व्हावी यासाठी नागरिकांकडून सूचना मागविण्यात येणार असून नागरिकांनी त्यांच्या आवारात, सोसायटय़ांमध्ये वृक्ष लागवडीसाठी जागा उपलब्ध असल्याचे कळविल्यास त्या ठिकाणी महापालिकेकडून वृक्ष लागवड करण्यात येईल असे जयस्वाल यांनी यावेळी स्पष्ट केले.