‘हरियाली’च्या प्रयत्नांना यश; रविवारी वनखात्याकडे जागा सुपूर्द करणार
अर्निबध वृक्षतोड आणि वाढत्या नागरीकरणामुळे झपाटय़ाने कमी होत चाललेली ठाणे जिल्ह्य़ातील वनसंपदा जपण्याच्या मोहिमेत ‘हरियाली’
संस्थेला भिवंडी तालुक्यात चांगले यश मिळाले आहे. वन खात्याकडून सात वर्षांपूर्वी वृक्ष लागवडीसाठी घेतलेल्या २५ एकर उजाड माळरानावर आता हिरवे जंगल उभे राहिले असून, येत्या रविवारी ते वन खात्याकडे सुपूर्द केले जाणार आहे.
ठाणे-नाशिक रस्त्यावर कल्याण फाटय़ापासून सहा कि.मी. अंतरावरील भवाळे या भिवंडी तालुक्यातील लोनाड गावाजवळील माळरानावर ‘हरियाली’च्या प्रयत्नांनी एक छोटेखानी जंगल रुजले आहे. कांचन, साग, कुडा, काटेसावर, सावर, आपटा, कडुनिंब आदी प्रकारच्या ३८ ते ४० हजार झाडांनी या ठिकाणच्या पूर्वीच्या उजाड रखरखाटीचा चेहरामोहरा बदलून सारा परिसर हिरवागार केला आहे. गेल्या सात वर्षांत येथे आठ ते दहा फूट उंचीची झाडे वाढली आहेत. पिसे-पांजरपोळ या मुंबई महापालिकेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाजवळील हे नव्याने रुजलेले जंगल भविष्यात एक चांगले पर्यटनस्थळ होऊ शकेल, असे मत ‘हरियाली’चे सचिव सूर्यकांत आपटे यांनी व्यक्त केले. २००८ मध्ये भवाळे येथील जागा ‘हरियाली’च्या ताब्यात आली. सुरुवातीच्या वर्षी महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने या ठिकाणी लागवड करण्यासाठी संस्थेला दहा हजार रोपे दिली. मात्र दुर्दैवाने पहिल्याच वर्षी वणव्यात ही सर्व रोपे जळून खाक झाली. तरीही हरियालीचे कार्यकर्ते निराश झाले नाहीत. त्यांनी नेटाने प्रयत्न सुरू ठेवले. महाविद्यालयीन विद्यार्थी, पर्यावरणप्रेमी नागरिक आणि ‘हरियाली’चे कार्यकर्ते यांच्या संयुक्त आणि सातत्याने केलेल्या प्रयत्नांनी या ठिकाणी हे हिरवे स्वप्न साकार झाले. या प्रकल्पासाठी विविध कंपन्यांनी त्यांच्या ‘सीएसआर’ योजनेतून निधी दिला. जून ते सप्टेंबर या काळातील प्रत्येक शनिवार-रविवारी या ठिकाणी श्रमदान शिबिरे भरविण्यात आली. परिसरातील लोनाड, चौदरपाडा आदी गावांतील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. त्यामुळे वृक्षतोडीचे तसेच वणव्यांचे प्रकार थांबले.

पाच तलाव, १५ बंधारे
या उजाड माळरानावर पूर्वी दगडखाणी होत्या. त्यातील काहींमध्ये पाण्याचे झरे होते. श्रमदानाने नीट बांधबंदिस्ती केल्यानंतर त्याचे तलावात रूपांतर झाले. सध्या एक मोठा आणि छोटे चार असे पाच तलाव या जंगलात तयार झाले आहेत. याशिवाय नैसर्गिकरीत्या वाहणारे पाणी अडविण्यासाठी १५ बंधारे ‘हरियाली’ने बांधले आहेत.

Gutkha worth six and a half lakh seized in Dindori taluka
दिंडोरी तालुक्यात साडेसहा लाखाचा गुटखा जप्त
Stormy rains damage mango orchards in Trimbakeshwar taluka
त्र्यंबकेश्वर तालुक्यात वादळी पावसामुळे आंबा बागांचे नुकसान
water shortage Nashik district
नाशिक : पाणी टंचाईचे नाशिक जिल्ह्यात दोन बळी, मायलेकीचा विहिरीत पडून मृत्यू
Unseasonal rains in Washim district
वाशीम जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

उजाड डोंगरमाथे आणि माळरानी हिरवाई रुजविणे हे हरियालीचे उद्दिष्ट आहे. भवाळे येथे आम्ही आमचे काम पूर्ण केले आहे. आता अशाच पद्धतीने नवी मुंबईतील रबाळे येथील उजाड डोंगरावर जंगल निर्माण करायचे आहे. याबाबतीत वन खात्याशी पत्रव्यवहार सुरू आहे. या ठिकाणी १२५ एकर जागेत वृक्ष लागवड करण्याची हरियालीची योजना आहे.
– सूर्यकांत आपटे, सचिव, हरियाली