प्लास्टिकच्या पिशव्यांसह लागवड, कंत्राटदाराचा निष्काळजीपणा

कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे लावलेली रोपे उपटून फेरलागवडीची नामुष्की ओढावली आहे. शहरातील हरित चौकांसाठी ही लागवड करण्यात आली होती; मात्र संबंधितांनी रोपाच्या मुळाशी असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांसकट लागवड केल्याचे एका वृक्ष अभ्यासकाच्या लक्षात आले. त्यांनी महापालिका प्रशासनाच्या ही बाब निदर्शनास आणून दिली.

ठाणे महापालिकेकडून शहरातील विविध चौकांचे तसेच रस्ता दुभाजकांवर सुशोभीकरणासाठी झाडांची रोपटी लावली जात आहेत. त्यानुसार तीन हात नाका ते रहेजा गृहसंकुलाच्या चौकापर्यंत काही दिवसांपूर्वी ती लावण्यात आली होती; परंतु ही रोपटी लावत असताना पुरेशी काळजी न घेता केवळ घिसाडघाई करत रोपे थेट प्लास्टिक पिशव्यांसहित रोपण करण्यात आली. अशा अशास्त्रीय पद्धतीने केलेल्या लागवडीमुळे रोपे मरण्याची शक्यता होती. अखेर हा प्रकार लक्षात येताच महापालिकेच्या आदेशाने पुन्हा ही झाडे उपटून काढण्यात आली आणि त्याच्या मुळाजवळील प्लास्टिक पिशव्या काढून त्यांचे दुसऱ्यांदा रोपण करण्यात आले.

झाडे कुजण्याची शक्यता

ठाण्यातील तीन हात नाका परिसर येथील दुभाजकावर सुशोभीकरणासाठी झाडे लावण्यात आली असून या झाडांची मुळे अत्यंत नाजूक असतात. त्यामुळे रोपण करताना त्याखालील प्लास्टिक पिशवी काढणे गरजेचे असते. अन्यथा प्लास्टिक पिशव्यांमध्ये पाणी साचून त्यामुळे मुळे कुजून जाऊन झाडे मरून जाण्याची शक्यता असते. पावसाळ्याच्या तोंडावर अशा प्रकारे वृक्षारोपण केल्यास झाडांना फायदा होण्याऐवजी तोटाच अधिक होत असतो. त्यामुळे अशा रोपणाचा काहीच उपयोग होत नसतो, असा दावा ठाणे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे पर्यावरणप्रेमी कौस्तुभ दरवेस यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केला आहे. यासंबंधी महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण अधिकारी केदार पाटील यांच्याशी संपर्क होऊनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.