नौपाडय़ातील रहिवाशांची महापालिका अधिकाऱ्यांकडे मागणी

नौपाडय़ातील महात्मा गांधी रस्त्यावरील सुमारे ३४ झाडांपैकी अडथळा ठरणारी केवळ ५ झाडे पुनरेपण करून बाकी झाडे जिथे आहेत, तिथेच ठेवण्याच्या सूचना गुरुवारी सकाळी नौपाडा परिसरातील नागरिकांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या. या भागातील झाडांची सुरू असलेली कत्तल थांबवण्यासाठी येथील नागरिकांनी आवाज उठवल्यानंतर पहिल्यांदाच महापालिका प्रशासनाच्या वतीने येथील नागरिकांशी संवाद साधला.  ‘लोकसत्ता ठाणे’च्या माध्यमातून याविषयीचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर महापालिकेने हा संवाद साधल्यामुळे नागरिकांनी ‘लोकसत्ता’चे आभार मानले आहेत.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून नौपाडय़ातील महात्मा गांधी रस्त्यावर उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात येत असून या कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. या कामादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या झाडांवर कुऱ्हाड चालवून येथील झाडे नष्ट करण्याचा प्रकार सुरू झाला होता. याविरुद्ध येथील नागरिकांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली. यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बुधवारी पालिका मुख्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करून शहरातील वृक्षतोडीचा आढावा घेतला. स्थानिक नागरिकांशी संवाद साधण्याची भूमिका स्पष्ट करण्यात आली. त्यानुसार गुरुवारी सकाळी महापालिकेचे उद्यान विभागाचे प्रमुख ओमप्रकाश दिवटे यांनी स्थानिकांशी संवाद साधला. तेथील उड्डाणपूल निर्मिती करणाऱ्या कंपनी प्रतिनिधींनी या कामाची माहिती स्थानिक नागरिकांना करून दिली. या वेळी या परिसरातील सुमारे ३४ झाडांपैकी केवळ ५ झाडे पुलास सर्वाधिक अडचणीची ठरत आहेत. त्यामुळे या धाडांचे शास्त्रोक्त पद्धतीने पुनरेपण करण्याची सूचना नागरिकांनी अधिकाऱ्यांना दिली. तर अन्य झाडे मात्र अडथळा ठरत नसल्याने ही झाडे कायम याच भागात राहावीत अशी अपेक्षा रहिवाशांनी व्यक्त केली.