ठाण्यातील लुईसवाडी, हाजुरी आणि पाचपाखाडी परिसरातील अनेक घरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेमधून या सगळ्या पट्टय़ाला कोणत्याही प्रक्रियेविना पाणीपुरवठा केला जात असतो. हे पाणी नागरिकांपर्यत पोहचविण्यापूर्वी ते शुद्ध केले जात असल्याचा दावा ठाणे महापालिकेमार्फत केला जात असला तरी गेल्या पंधरवडय़ापासून अनेक भागात दूषित पाणी येत असल्याने पाणीपुरवठा विभागाचे अधिकारीही चक्रावून गेले आहेत. या सर्व पट्टय़ाातील रहिवाशांनी पाणी उकळून तसेच गाळून प्यावे, तसेच क्लोरिनच्या वापराने शुद्ध करून घ्यावे, अशा सूचना आरोग्य विभागाने केल्या आहेत.
सद्यस्थितीत ठाणे महापालिकेच्या वतीने पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी क्लोरिन मिसळण्यात येत असून भविष्यात या सगळ्या पट्टय़ात टेमघर येथील पाणी योजनेतून पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव असल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाने केला आहे. मात्र तोपर्यंत या भागातील नागरिकांनी उकळून आणि गाळून प्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. लुईसवाडी, हाजुरी आणि पाचपाखाडी परिसरातील काही वसाहतींमध्ये मुंबई महापालिकेच्या पाणी योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. अशा वसाहतींचा आकडा बराच मोठा असून कच्च्या स्वरूपाचे हे पाणी गाळयुक्त अससल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. पावसाळ्यात या पाण्याची गुणवत्ता अधिकच घसरते. मागील वर्षीय या भागामध्ये अत्यंत गढूळ आणि गडद तांबडय़ा रंगाचा पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या होत्या. हे पाणी पिण्यायोग्य नसल्याच्या तक्रारी असून त्यामुळे येथील रहिवाशांना टायफाईड, कावीळ अशा साथींच्या रोगांची लागण झाली होती. या भागात १२ महिने मुंबई महापालिकेच्या जलवाहिन्यातून पाणीपुरवठा केला जातो. हे पाणी शुद्ध करण्याची प्रक्रिया योग्य प्रकारे केली जात नसल्याचे या विभागातील काही सामाजिक संस्थांचे तसेच लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे. या विषयीच्या महापालिकेकडे येणाऱ्या तक्रांरी वाढू लागल्या आहेत. दरम्यान, मुंबई महापालिकेच्या पाणी योजनेतून मिळणाऱ्या पाण्याच्या शुद्धीकरणासाठी क्लोरीनचा वापर केला जात असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे. असे असले तरी गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी कायम असल्याने या भागातील रहिवाशांनी पाणी उकळून आणि गाळून प्यावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. भविष्यात या भागामध्ये टेमघर पाणीपुरवठा प्रकल्पामध्ये बृहन्मुंबई महापालिकेचे पाणी घेऊन ते शुद्ध करून त्याचा पुरवठा करण्याचे काम प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती, महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.