डहाणूच्या ‘कासव बचाव केंद्रात’ उपचार

केळव्याच्या समुद्रकिनारी जखमी अवस्थेत सापडलेल्या एका कासवाला प्राणिमित्र संस्थेने वेळीच केलेल्या उपचारांमुळे जीवदान मिळाले. या कासवाला उपचार मिळावे यासाठी ‘टर्टल अ‍ॅम्ब्युलन्स’ बोलावण्यात आली. त्याद्वारे त्याच्यावर उपचार करण्यात आले. आता हा कासव पूर्ण बरा झाला असून त्याला पुन्हा समुद्रात सोडण्यात आले आहे.

डहाणू ते दातिवरे या पट्टय़ात अनेक कासवांच्या (ग्रीन टर्टल) प्रजाती आहेत. त्यांची मादी अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर येत असतात, मात्र विविध कारणांमुळे या कासवांचा मृत्यू होत असतो. या कासवांना वाचवून त्यांचे संवर्धन करण्यासाठी वनविभाग आणि वाइल्ड लाइफ कन्झव्‍‌र्हेटिव्ह अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर या संस्थेने पुढाकार घेतला आहे. डहाणू येथे वनविभागाने ‘कासव बचाव केंद्र’ उभारले आहे. संस्थेचे स्वयंसेवक विविध ठिकाणी जाऊन नागरिकांमध्ये कासवांबाबत जनजागृती करत असतात.

दहा दिवसांपूर्वी केळवे येथील एका मच्छीमारास एक कासव समुद्रकिनारी आढळले. ते जखमी अवस्थेत होते. त्यांनी केळवे गावातील पर्यावरण मित्र योगेश पालेकर यांना संपर्क केला. पालेकर यांनी कासवाला पाहिले असता त्याला फुप्फुसाचा आजार झाल्याचे लक्षात आले. त्यांनी ताबडतोब वाइल्ड लाइफ कन्झव्‍‌र्हेटिव्ह या संस्थेला कळवले. जखमी कासवांना उपचार मिळावे यासाठी संस्थेने टर्टल अ‍ॅम्ब्युलन्स बनवली आहे. या रुग्णवाहिकेतून त्वरित या कासवाला बचाव केंद्रात आणण्यात आले. तेथे त्याच्यावर डॉ. विनेश विनेकर यांनी उपचार केले. अशा प्रकारे जखमी कासव आढळले, तर संस्थेला अथवा वनविभागाशी संपर्क करावा, असे आवाहन पालेकर यांनी केले आहे.

हे कासवाचे पिल्लू ९ इंचाचे होते. साधारण अशा कासवांना फुप्फुसाचा आजार असतो. त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो. त्यामुळे कासव काठाला येते. मात्र पुन्हा पाण्यात जायचा प्रयत्न केला तरी ते पाण्यात जाऊ  शकत नाही. ते वरच्या थरात तरंगत राहते. वेळीच उपचार मिळाले नाही की हे कासव दगावते. बुधवारी संध्याकाळी उपचारानंतर कासव पूर्ण बरा झाला. त्याला पुन्हा केळवे येथील समुद्रात आणून सोडण्यात आले.

योगेश पालेकर, पर्यावरण मित्र