ठाण्यातील पाचपाखाडी परिसरातील गाडी जळीत प्रकरणातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. ठाणे पोलिसांनी २४ तासात गाड्या जळीत प्रकरणाचा छडा लावला असून या प्रकरणातील दोन आरोपींना नौपाडा पोलिसांनी अटक केली असून एका आरोपीचा शोध सुरु आहे. या प्रकरणी पोलिसांनी २० वर्षीय रोहन सावंत आणि त्याचा साथीदार हिमांशू उर्फ टिनू सावंत यांना अटक केली. त्यांच्या तिसऱ्या साथीदाराचे नाव ओंकार भोसले असे असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. केवळ ‘व्हॉट्सअॅप’वरील  वादग्रस्त चर्चेच्या  रागातून हा प्रकार घडला असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

ठाण्यातील सिद्धेश्वर तलाव परिसरात रविवारी पहाटे एक रिक्षा आणि ६ मोटार सायकल जाळण्याचा प्रकार घडला होता. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी या आरोपींचा ताब्यात घेतले. एका दुचाकीची काच फोडल्याच्या वादातूनंतर दोन गटातील वाद सुरु झाला. खोपोली येथून पिकनिक करून परतत असताना पोलिसांनी कळवा येथून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. दोघेही एका खाजगी संस्थेत कामाला आहेत. काही दिवसांपूर्वी ठाण्यातील पाचपाखाडी येथे गाडीची काच फोडल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर ‘व्हॉट्सअॅप’वर दोन गटात वाद सुरु झाला होता.

रोहन सावंत आणि त्याचा साथीदार हिमांशू उर्फ टिनू सावंत आणि त्यांचा तिसरा मित्र ओंकार भोसले या तिघांना आपल वर्चस्व दाखविण्यासाठी गणेशवाडी येथे उभी असलेल्या गाडीतील पेट्रोल काढून ती गाडी जाळली. यात १ रिक्षा आणि ७ मोटारसायकल जाळण्यात आल्या. सीसीटीव्ही च्या माध्यमातून पोलिसांनी २४ तासात छडा लावून या २ आरोपींना अटक केली. हे दोघही गणेशवाडी परिसरातील रहिवाशी असून ते एका खाजगी कंपनीत कामाला आहेत. या प्रकरणातील ओंकार भोसले हा आरोपी अद्याप फरार असून त्याच्यावर या आधीही अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन्ही आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.